आजादी की कभी शाम ना होने देंगे...
By Admin | Updated: August 15, 2014 01:11 IST2014-08-15T00:43:05+5:302014-08-15T01:11:28+5:30
आडगावच्या सैनिकांना सलाम

आजादी की कभी शाम ना होने देंगे...
मुबीन पटेल, पिशोर
पूर्वी सैन्यदलात भरती होण्यासाठी तरुण सहजासहजी पुढे येत नसत, म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा...’ अशी हाक घालावी लागली होती; परंतु गावातील वडीलधाऱ्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू केलेल्या देशसेवेच्या चळवळीला तरुणाईने साद दिली आणि सैनिकांचे गाव म्हणून गावाची ख्याती झाली व आडगाव पिशोरने रचली यशोगाथा...
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वसलेले आणि अवघी तीन हजार लोकसंख्या असलेले आडगाव (पिशोर). या गावाला ७७ वर्षांची सैन्यपरंपरा लाभली असून, अजूनही अनेक तरुण सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करीत आहेत. १९३७ साली ग्वाल्हेर पायदलात (इन्फंट्री) गावातील फकीरराव हैबतराव भोसले दाखल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परिस्थिती जवळून पाहिलेल्या फकीररावांनी तरुणांना सैन्यदलात येण्यासाठी प्रवृत्त केले. निवृत्त झाल्यानंतरही पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर त्यांनी काम केले. ‘गार्ड आॅफ आॅनर’चा सन्मान त्यांना मिळाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत भोसलेंचा सुरक्षेसाठी राहावे लागत असे. देशसेवा करणारा पती मिळावा, अशीच इच्छा गावातील तरुणींना आहे. सैनिक जीवनसाथी मिळवून ५0 मुलींनी देशसेवा करणाऱ्या जवानांचा संसार फुलवला आहे. पूर्वजांपासून मिळालेले देशसेवेचे धडे आम्ही मनात साठवलेले असून, मोठा भाऊ व मी स्वत: सैन्यात असून, भावी पिढीला धडे देण्याचा मानस तरुण सैनिक स्वप्नील भोसले याने बोलून दाखवला.
सुटीसाठी घरी आलेले व सध्या लडाख येथे सेवा बजावणारे लान्स हवालदार अयूब मदार राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये १९ वर्षांपासून कार्यरत आहेत. लोकमतशी बोलताना त्यांनी अनुभव कथन केले. बारामुल्ला येथे असताना जवळच असलेल्या वानेगाव येथे हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेच्या अतिरेक्यांबरोबर झालेल्या चकमकीबद्दल त्यांनी सांगितले तेव्हा अंगावर शहारे आले. या बटालियनने १५८ अतिरेक्यांना कंठस्नान घातले असून, २९ जिवंत, तर २५ अतिरेक्यांना आत्मसमर्पण करावयास भाग पाडले आहे.
गावातील कुठल्याही सैनिकाला अपयश आलेले नसल्याने सैन्याकडे तरुणांचा कल वाढलेला आहे. शारीरिक क्षमतेअभावी तरुणांना कधी कधी भरती होण्यास त्रास घ्यावा लागतो. शासनाने व्यायामशाळा उपलब्ध करून दिल्यास सोय होईल, असे पं.स. सदस्य परशराम बोलकर यांनी सांगितले.
पिशोर येथे शिक्षिका असलेल्या रेखा प्रकाश भोसले या आडगाव जि.प. शाळेत येथील सून असून, त्यांचे पती प्रकाश भोसले व दीर अनिल भोसले दोघे सैन्यदलात आहेत. नणंद सरिता याही सैनिक पतीसोबत सुखाने संसार करीत आहेत. दोघांकडूनही देशाच्या रक्षणाचे काम होत आहे आणि माझ्याकडून देश घडविण्याचे. तिघांचेही जीवन देशासाठी कामी येत असल्याचा व आडगावची सून असल्याचा अभिमान असल्याचे रेखा भोसले यांनी सांगितले.
ही ७७ वर्षांची परंपरा कधीही खंडित होऊ देणार नाही. देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असल्याचे प्रतिपादन गावातील तरुणांनी व्यक्त केले.
आडगावचे ४५ तरुण पोलीस खात्यात, देशसेवेची परंपरा कायम
७७ वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची जबाबदारी आडगावच्या तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
आडगाव (पिशोर) येथून १४0 जवान देशाची सेवा करीत आहेत. राज्यातील कोणत्याही गावापेक्षा ही संख्या अधिक असल्याचा विश्वास ग्रामस्थांना आहे. सैन्याबरोबर ४५ तरुण पोलीस खात्यात, तर ज्ञानार्जन करून समाजसेवा करणारे ७0 शिक्षकही आडगाव (पि.) येथे आहेत.