ना यांचा, ना त्यांचा...रस्ता खड्ड्यांचा; सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंतची वाट अवघड

By विकास राऊत | Updated: January 22, 2025 14:49 IST2025-01-22T14:47:22+5:302025-01-22T14:49:34+5:30

खड्डे चुकवून वाहन चालविण्यामुळे अनेकांचे किरकोळ अपघात होत आहेत. तर खड्ड्यांमुळे पाठीचे दुखणे नागरिकांच्या मागे लागत आहे.

Neither theirs nor theirs... the road is full of potholes; the journey from CIDCO bus stand to Harsul T-point is difficult | ना यांचा, ना त्यांचा...रस्ता खड्ड्यांचा; सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंतची वाट अवघड

ना यांचा, ना त्यांचा...रस्ता खड्ड्यांचा; सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंतची वाट अवघड

छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंतचा ५ किमी रस्ता सध्या पूर्णत: खड्ड्यात गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तो रस्ता महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडे (एमएसआयडीसी) वर्ग झाला आहे. रस्ता बांधकाम विभागाकडे नसल्याने त्यांनी खड्डे भरण्याची जबाबदारी झटकली आहे. तर एमएसआयडीसीने काम सुरू होणारच आहे, त्यामुळे खर्चाचा भुर्दंड नको म्हणून त्यांनीही आखडता हात घेतला आहे. परिणामी, खड्डे चुकवून वाहन चालविण्यामुळे अनेकांचे किरकोळ अपघात होत आहेत. तर खड्ड्यांमुळे पाठीचे दुखणे नागरिकांच्या मागे लागत आहे.

दिवसभरात २२ हजार वाहने धावतात ५ किमी खड्ड्यातून
पॅचवर्कवरच आजवर रस्ता टिकविल्यामुळे प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत. दोन्ही बाजूंनी फेरफटका मारला असता ३०० हून अधिक लहान-मोठे खड्डे आहेत. दररोज २० ते २२ हजार वाहनचालक खड्ड्यातून ये-जा करीत आहेत.

१० वर्षांत पाच कोटींचा खर्च..
२०१३ साली ‘लोकमत’ने रस्त्यांच्या खड्ड्यांवरून छापलेल्या वृत्तमालिकेतून जनआंदोलन उभे करून मनपा, बांधकाम विभाग व राज्यशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे ३ कोटींतून या रस्त्याचे नूतनीकरण झाले. त्यानंतर २०१७ साली बांधकाम विभागाने १ कोटीतून डागडुजी केली. २०२२ मध्येही पॅचवर्क केले.

६६ कोटींचे काम कधी सुरू करणार...
६६ कोटींतून या रस्त्याचे चौपदरीकरण एमएसआयडीसी करणार आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल. कंत्राटदाराला मोठे खड्डे भरण्याच्या सूचना केल्या आहेत. रस्ता खोदण्यासाठी व वाहतूक एकमार्गी करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड आणि रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी मिळेल.
-सुनील ठाकरे, कार्यकारी अभियंता, एमएसआयडीसी

बांधकाम विभागाकडून रस्ता गेला...
बांधकाम विभागाने सिडको बसस्थानक ते हर्सूल टी-पॉइंटपर्यंतचा रस्ता एमएसआयडीसीकडे वर्ग केला आहे. त्यामुळे नवीन काम सुरू होईपर्यंत खड्डे भरण्याची रस्ता वाहतुकीसाठी चांगला ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे.
-एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी

मणक्याचे आजार होतात..
खड्ड्यातून वाहने चालविल्यास मणक्यांमध्ये गॅप पडू शकतो. मणक्यातील गादी सरकू शकते. पायांच्या संवेदना कमी होऊ शकतात. ऑपरेशनची वेळदेखील येऊ शकते.
-डॉ. वज्रपाणी पाटील, अस्थिरोग तज्ज्ञ

Web Title: Neither theirs nor theirs... the road is full of potholes; the journey from CIDCO bus stand to Harsul T-point is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.