टंचाई निवारणार्थ कठोर कारवाईची गरज

By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:30:31+5:302014-06-30T00:39:38+5:30

फकिरा देशमुख , भोकरदन तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवाण करण्यासाठी धरणात असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करणे आवश्यक झाले आहे.

The need for strict action against the scarcity | टंचाई निवारणार्थ कठोर कारवाईची गरज

टंचाई निवारणार्थ कठोर कारवाईची गरज

फकिरा देशमुख , भोकरदन
तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवाण करण्यासाठी धरणात असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करणे आवश्यक झाले आहे. धरणातील पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे़
जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचा थेंबसुध्दा पडलेला नाही. गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील जुई, धामणा, पद्मावती, बाणेगाव, चांदई, पळसखेडा दाभाडी हे मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरले होते. त्यामुळे या धरणातून शेतकऱ्यांना रबीच्या पिकासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र यंदा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
असे असताना सुध्दा प्रशासनाच्या वतीने अद्याप धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यांचे नियोजन करण्यात आले नाही किवा धरणातील सुरू असलेल्या पाणी चोरीला कोणीही लगाम लावण्याचे काम केलेले नाही. त्यामुळे सर्वच धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, मिरची आदी पिकांची उन्हाळी लागवड केली आहे. त्यामुळे सर्वच मध्यम प्रकल्पाच्या परिसरात शेती हिरवी गार झाल्याचे दिसत आहे. मात्र जर पंधरा दिवसांत पाऊस पडला नाही तर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. तसेच तालुक्यातील काही पाझर तलावांमध्येसुध्दा आज पाणीसाठा आहे. तो राखीव ठेवणे गरजेचे आहे.
त्यामुळे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे पथक तयार करून तालुक्यातील मध्यम प्रकल्प, पाझर तलावामध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठा राखीव ठेवण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. भोकरदन शहरासह २० गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या दानापूर येथील जुई धरणात २ ते ३ फुट पाणी साठा शिल्लक आहे.
जर या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन झाले नाही तर अर्ध्या तालुक्याचा पाणीप्रश्न बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच पाऊस लांबल्याने पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
रिधोरा देवी मध्यम प्रकल्पातून पाणी चोरी, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी मध्यम प्रकल्पातून धानोरा, टाकळी कोलते, लोधेवाडी, पिंपळगाव कोलते, रिधोरा, आदी गावांना पाणीपुरवठा होतो. या धरणात सध्या २ फुटांपर्यंत पाणीसाठा आहे. मात्र धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी धरणातच मोटारी टाकून पाणी चोरी सुरू केली असल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. प्रशासनाने धरणातील पाणी चोरीला आळा घालावा अशी मागणी पिंपळगाव कोलते ग्रामपंचायतीचे उपसंरपच भाऊसाहेब सोळुंके यांनी फुलंब्री तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.भोकरदन तालुक्यातील विविध मध्यम व लघु प्रकल्पांतून पाणी उपसा होत असल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

Web Title: The need for strict action against the scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.