३०० कोटीपेक्षा अधिकची वसुली हवी
By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:46:01+5:302014-06-25T01:05:31+5:30
उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांची ‘धमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे़

३०० कोटीपेक्षा अधिकची वसुली हवी
उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांची ‘धमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे़ डीसीसीने मे २०१४ अखेरपर्यंत जवळपास ७०० कोटी रूपयांचे शेती, बिगरशेतीचे कर्जवाटप केले आहे़ तर ठेवीदारांचे बँकेत ४१८ कोटी रूपये आहेत़ बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कर्जदारांकडील अनुत्पादक (थकित) जवळपास ३०८ कोटी रूपये आजघडीला वसूल होणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना व जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत़ जिल्हा बँक, तेरणा असो अथवा तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना असो शेतकरी, शेतमजुरांच्या अथक प्रयत्नातून या संस्था उभ्या राहिल्या आहेत़ प्रारंभीच्या काळात बँकेसह कारखान्याच्या कामकाजामुळे जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर गेले होते़
सद्यस्थितीत जिल्हा बँकेचे सोसायटी सभासद १ लाख, ६४ हजार, ८७८, ठेवीदार सभासद ६ लाख, ३९ हजार तर २८९ संस्था सभासद आहेत़ डीसीसीने शेती, बिगर शेतीसाठी जवळपास ६९१ कोटी ८९ लाख, २४ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे़ तर ठेवीदारांचे बँकेत ४२७ कोटी, २३ लाख, ६६ हजार ९४१ रूपये आहेत़ ही रक्कम पाहता बँकेला कर्जवसुलीनंतर ३०० कोटीच्या जवळपास फायदा होऊन बँकेचे पुढील व्यवहार सुरळीत चालणार आहेत़ बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकींग परवाना मिळविण्यासह सीबीएससाठी मोठे प्रयत्न केले आहेत़ त्या प्रयत्नामुळे अपेक्षित कर्जवसुली झाल्याने बँकेला बँकींग परवाना मिळाला़ तर शेती, बिगर शेती कर्जाच्या थकबाकीदारांमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडेच मोठ्या रक्कमा थकल्याचे दिसून येते़ त्यामुळे नेतेमंडळींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकारण करण्याऐवजी स्वत:च्या कार्यकर्त्याकडील पैसा वसूल करून बँकेला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शेतकरी, ठेवीदार, सर्वसामान्यांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
६ कोटी कधी होणार वसूल ?
जिल्हा बँकेचे जवळाबाजार (ता़औंढा नागनाथ जि़हिंगोली) येथील बाराशिव साखर कारखान्याकडून २ कोटी, १६ लाख, २९ हजार रूपये तर किल्लारी (ता़औसा जि़लातूर) येथील कारखान्याकडून ३ कोटी, ९८ लाख, ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे़ जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना कर्जवाटप करून अनेक वर्षे लोटली तरी वसुली झालेली नाही़
न्यायालयीन प्रक्रियेत अडकली वसुली
श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना व तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने कारवाई केली होती़ तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची जवळपास ३७ हेक्टर ५३ आर जमीन व कारखान्याचे प्लॅन्ट, मशनरी जप्त केले होते़ मात्र, कारखान्याने मुंबई येथील डीआरएटी न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जवसुली होणार आहे़
केंद्र, राज्य शासनाकडून २३५ कोटी येणे
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे राज्य शासनाकडून थकहमीचे ११४ कोटी, केंद्र शासनाचे सन २०११-१२ व १२-१३ चे व्याजपरतावाचे १५ कोटी, ५० लाख, केंद्र व राज्य शासनाकडून वैद्यनाथ समितीचे ९८ कोटी ७६ लाख, खादी ग्रामोद्योग कर्जमाफीचे ६ कोटी ५० लाख असे जवळपास २३४ कोटी, ७६ लाख रूपये येणे आहे़ ही रक्कम शासनाकडून आणण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित जोर लावण्याची आवश्यकता आहे़