ज्ञानसंपत्तीचे समान वाटप होण्याची गरज...

By Admin | Updated: August 23, 2015 23:47 IST2015-08-23T23:43:33+5:302015-08-23T23:47:20+5:30

लातूर : राष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टी आणि योग्य नियोजन महत्त्वाचे असून, त्यासाठी मध्यम मार्गाची संस्कृती घातक असल्याचे प्रतिपादन

The need for equitable allocation of knowledge ... | ज्ञानसंपत्तीचे समान वाटप होण्याची गरज...

ज्ञानसंपत्तीचे समान वाटप होण्याची गरज...


लातूर : राष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टी आणि योग्य नियोजन महत्त्वाचे असून, त्यासाठी मध्यम मार्गाची संस्कृती घातक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे केले़
प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार यांचा सपत्निक नागरी सत्कार रविवारी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पंडीत विद्यासागर, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ पुरुषोत्तम खेडेकर, प्रा़ डॉ़ अशोक चौसाळकर, प्रा़ डॉ़ ज़ रा़ दाभोळे, डॉ़ गोपाळराव पाटील, आ़ विक्रम काळे, अ‍ॅड़ मनोहर गोमारे, अजय ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती़
चाकूरकर म्हणाले, जगभरात विचारवंतांची कदर केली जाते़ विचारवंतच देशाला दिशा देऊ शकतात़ आता विचारवंतांनी केवळ सल्ले देऊन चालणार नाही़ त्यासंबंधीचे उपाय आणि सूचना सुचविल्या पाहिजेत़ सामाजिक न्याय सर्वांना मिळाला पाहिजे़ शिवाय, तंत्रज्ञान आणि विज्ञानाला आपण अधिक महत्व दिले पाहिजे, असेही ते म्हणाले़ सन्मानपत्राचे वाचन प्रा. उमाकांत जाधव यांनी केले. प्रास्ताविक प्राग़णेश बेळंबे यांनी केले़ यावेळी ‘विचारवंत आणि समाज’ या विषयावर वक्त्यांनी विचार मांडले़ माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, आ. विक्रम काळे यांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी)
ज्ञानाबरोबर मूल्य शिक्षण देतो, तोच खरा शिक्षक. खऱ्या शिक्षकाचा प्रभाव अनंत काळापर्यंत असतो़ मात्र अलिकडे शिक्षण क्षेत्रात बाजारीकरणामुळे मूल्य संपुष्टात येत आहे. शिक्षणाची ही शोकांतिका समाजाची असते़ विचार करणे हे सगळ्यात कठीण काम आहे़ विचारवंत विचार देत असतो. त्याच्या विचाराची दिशा समाजाच्या हिताची असते, असे माजी खा़ डॉ़ जनार्दन वाघमारे यावेळी म्हणाले.
४जगात मुर्ख माणसे ठाम तर शहाणी माणसे संभ्रमात असतात़ त्यामुळे मोठी गफलत होते़ जीवन अर्थपूर्ण जगायचं असेल तर ‘शॉर्टकट’ मार्ग नको़ विचारांसोबत माणसं बदलली पाहिजेत़ त्याशिवाय विकास आणि प्रगती अशक्य आहे़ संवेदनशीलता जपत प्रत्येक माणसाने उपेक्षित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा़डॉ़ज़रा़दाभोळे यांनी केले़
राष्ट्रीय संपत्तीबरोबर ज्ञानसंपत्तीचे समान वाटप झाले पाहिजे़ धर्म आणि इतिहासातील वाद संपुष्टात आले पाहिजेत़ त्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे़ जोपर्यंत संपत्ती आणि ज्ञानसंपत्ती याचे समान वाटप होणार नाही, तोपर्यंत इथल्या सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही़ अलिकडे धर्म आणि इतिहासासंदर्भात जो वाद निर्माण होतोय, तो संपविण्यासाठी वैचारिक चर्चा होणे गरजेचे आहे. शिवाय, चळवळीतील कार्यकर्ता विचारवंतांचे मार्गदर्शन घ्यायला तयार आहे. परंतु, काही घटनांवर विचारवंत भूमिका स्पष्ट करीत नाहीत, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले.

Web Title: The need for equitable allocation of knowledge ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.