फुले-शाहू-आंबेडकरांच्या शैक्षणिक धोरणाची गरज
By Admin | Updated: January 12, 2015 14:16 IST2015-01-12T13:55:07+5:302015-01-12T14:16:58+5:30
बहुजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी शिक्षणावर २३ टक्के खर्च करून शिक्षण सक्तीचे केले. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणावरील खर्च २ टक्क्यांवर आला आहे.

फुले-शाहू-आंबेडकरांच्या शैक्षणिक धोरणाची गरज
लातूर : बहुजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी शिक्षणावर २३ टक्के खर्च करून शिक्षण सक्तीचे केले. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणावरील खर्च २ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आज फुले-शाहू-आंबेडकरांचे शैक्षणिक धोरण राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी येथे केले.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्यात दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यंकटराव जाधव होते. मंचावर शिवाजी सोमवंशी, एकनाथराव कर्हाळे, आनंद मुसळे, इम्रान सय्यद, महेश आचवले, कादीर जागीरदार, प्रा. केशव आलगुले, मनोज भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांनी शिक्षणासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून त्यांच्या कल्याणासाठी शैक्षणिक कार्य केले. शाहू महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. छत्रपती शाहू महाराजांप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी मी राज्यभर फिरत आहे. बहुजनांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
महात्मा फुले यांनी स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या माध्यमातून शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाचा विषय समाजासमोर मांडला. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
सूत्रसंचालन गोविंद लहाने यांनी केले. तर आभार आनंद मुसळे यांनी मानले. यावेळी रेहान देशमुख, समीर देशमुख, शहुर बागवान, मनोज भिसे, पद्माकर आयनिले, पांडुरंग पवळे, मनीषा जगताप, केशव आलगुले, श्रीकृष्ण पाटील, राहुल पाटील, यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)