मराठवाड्यातील सर्वच पुलांच्या आॅडिटची गरज
By Admin | Updated: August 4, 2016 23:56 IST2016-08-04T23:56:24+5:302016-08-04T23:56:40+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच पुलांच्या आॅडिटची गरज निर्माण झाली आहे. साधारणत: पुलांची वाहन निर्वहन क्षमता २० वर्षांपर्यंत असू शकते.

मराठवाड्यातील सर्वच पुलांच्या आॅडिटची गरज
औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वच पुलांच्या आॅडिटची गरज निर्माण झाली आहे. साधारणत: पुलांची वाहन निर्वहन क्षमता २० वर्षांपर्यंत असू शकते. परंतु त्यापुढील वयोमान झालेल्या पुलांचे नियमित आॅडिट करणे गरजेचे असल्यामुळे विभागातील अती जुने ११ आणि अलीकडच्या काळात बांधण्यात आलेल्या ७० पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटचे बांधकाम विभागासमोर आव्हान आहे. पुलांचा निश्चित कुठलाही आकडा विभागाकडून ठामपणे सांगण्यात आलेला नाही. मराठवाड्यात गोदावरी, पूर्णा व इतर नद्यांवर पूल आहेत. मात्र, त्या पुलांच्या तपासणीसाठी ब्रीज इन्स्पेक्शन युनिट विभागात नाही.
दरम्यान, मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार यांनी सांगितले, स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरू आहे. सर्व स्तरावर याप्रकरणी सूचना करण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद विभागात मोठे पूल असून ते जुने आहेत. त्यांची तपासणी करून अहवाल देण्यासाठी अभियंत्यांचे पथक रवाना करण्यात आलेले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावरच माहिती समोर येणे शक्य आहे. विभागाकडे आॅडिट करण्यासाठी यंत्रणा नसली तरी प्रत्यक्ष पाहणी करूनच अभियंते अहवाल देतील.
पुलांच्या आॅडिटसाठी कॉलमचे पिलर्स व बेअरिंग, बीममधील डिक, पुलांवरील सरफेसची स्थिती, पुलांचा पाया, अब्युटमेंटस्, ड्रेनेज व संरक्षक भिंत यासह बारा निकष आहेत. पावसाळ्यात व त्यानंतर पाया, वादळात व त्यानंतर स्ट्रक्चरल, पुरानंतर पुलांचे बेअरिंग्ज आणि सांधे तपासणे गरजेचे आहे. अशा सूचना असतानाही त्यांचे पालन होत नाही.
औरंगाबादेत किती पूल ?
कन्नड, शहागड, पैठण (आपेगाव), छावणी लोखंडी पूल, महेमूद दरवाजा, बारापुल्ला दरवाजा, मकई दरवाजा, नागेश्वरवाडी, कायगाव टोका, अजिंठा येथील पूल जुने आहेत. परंतु ते केव्हाचे आहेत. याबाबत आॅडिटचे आदेश अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यातील छावणीतील लोखंडी पुलाला अनेक वेळा डागडुजी करण्यात आली आहे. तोदेखील वाहतुकीसाठी धोकादायकच म्हणावा लागेल.
मराठवाड्यात ११ जुने पूल आहेत. जे जीर्ण झाले आहेत. शिवाय अलीकडच्या काळात बांधलेले जिल्हा मार्गांना जोडणारे ७० हून अधिक पूल मराठवाड्यात आहेत. जालन्यातील लोखंडी पूल, पूर्णा येथील पूल, हे अती जुने पूल सध्या विभागात आहेत. मराठवाड्यात मागील २० वर्षांत बांधलेल्या पुलांचेदेखील स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विभागात काही निजाम तर काही ब्रिटिशकालीन पूल आहेत.