सभापती निवडीतही निलंग्याला झुकते माप
By Admin | Updated: April 3, 2017 22:44 IST2017-04-03T22:42:58+5:302017-04-03T22:44:49+5:30
लातूर : जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली

सभापती निवडीतही निलंग्याला झुकते माप
लातूर : जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती निवडीतही निलंग्याला सर्वाधिक वाटा देण्यात आला असून, समाजकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद निलंग्याला मिळाले आहे.
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. त्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले. २१ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली. त्यात अध्यक्षपद निलंगा तालुक्याला बिनविरोध देण्यात आले. तर आता दोन सभापती पदे निलंगा तालुक्याला मिळाल्याने पालकमंत्र्यांचे तालुक्यावर विशेष प्रेम दिसून येत आहे.
सोमवारी झालेल्या विषय समित्यांच्या निवडीत समाजकल्याण सभापतीपदी संजय दोरवे, महिला बालकल्याण- संगीता घुले, अर्थ व बांधकाम- प्रकाश देशमुख, कृषी व पशुसंवर्धनच्या सभापतीपदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. ५८ पैकी ३७ सदस्य भारतीय जनता पक्षाचे असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडही बिनविरोध झाली होती. सोमवारी विषय समितीच्या सभापतींच्या निवडी झाल्या. प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने सर्व सभापती बिनविरोध निवडून आले.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती मतदारसंघातील भाजपाचे प्रकाश देशमुख यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील कासारशिरसी गटातून निवडून आलेले बाळासाहेब जाधव यांना कृषी व पशुसंवर्धन, हलगरा गटातून निवडून आलेले संजय दोरवे यांच्याकडे समाजकल्याण तर रेणापूर तालुक्यातील कामखेडा गटातून निवडून आलेल्या संगीता घुले यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध वर्णी लागली आहे.