नियोजित प्रचारयंत्रणेमुळे राष्ट्रवादीचा विजय

By Admin | Updated: October 20, 2014 00:32 IST2014-10-20T00:28:28+5:302014-10-20T00:32:15+5:30

कळंब : निवडणुकीचे नेटके नियोजन आणि निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेला टार्गेट करुन कोंंडीत पकडल्यानेच कळंब-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीला विजयश्री खेचून आणता आली.

NCP's victory due to planned propaganda | नियोजित प्रचारयंत्रणेमुळे राष्ट्रवादीचा विजय

नियोजित प्रचारयंत्रणेमुळे राष्ट्रवादीचा विजय


कळंब : निवडणुकीचे नेटके नियोजन आणि निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेला टार्गेट करुन कोंंडीत पकडल्यानेच कळंब-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीला विजयश्री खेचून आणता आली. शिवसेनेच्या या पराभवास भाजपानेही हातभार लावल्याने यापुढे भाजपाला गृहीत धरुनच सेनेला चालावे लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
कळंब-उस्मानाबाद मतदारसंघात यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली. प्रथम चौरंगी वाटणारी लढत पुढे तिरंगी व शेवटच्या टप्प्यात दुरंगीच झाली. यामध्ये राष्ट्रवादीने नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवून केलेले काम सरस ठरले. प्रत्येक गावांमध्ये कार्यकर्ता कामाला लावून गावातील मतदान इतरत्र न सरकु देण्याची राष्ट्रवादीची पॉलिसी परिणामकारक ठरली. यासाठी राष्ट्रवादीने सहा महिन्यांपासून तयारी केली होती. शिवसेनेला तेरणा साखर कारखान्याच्या मुद्याने अडचणीत आणले. तेरणा प्रकरणी राष्ट्रवादीने केलेल्या आक्रमक आरोपांच्या फैरींचा ओमराजेंना त्याच ताकदीने प्रतिकार करता आला नाही. कारखान्याची दुरवस्था, आर्थिक व्यवहार तसेच कारखान्यामुळे शेतकरी, कामगार आदींचे झालेले हाल व मुद्यावर राष्ट्रवादीने सेनेला चांगलेच कोंडीत पकडले होते. मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी तेरणा सभासदांना १०० रुपयांचा शेवटचा हप्ता देवून याविषयीची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न ओमराजेंनी केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचा असंताष अखेर विरोधी मतांनी प्रकट झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
शिवसेनेमधील अंतर्गत नाराजीनेही निवडणूक काळात कहर केला होता. ओमराजे गट विरुद्ध सर्व गट अशी सरळ विभागणी सेनेमध्ये दिसून आली. त्यातच जि.प. व पं. स. च्या निवडणुकीमध्ये काही निर्णय परस्पर घेतल्यानेही सेनेचा एक गट ओमराजेंवर नाराज होता. पक्ष संघटनेत हस्तक्षेप केल्यामुळे या रागात आणखी भर पडली. परिणामी या सर्व रागाचा भडका या निवडणुकीत उडाला व नाराज गटाने राष्ट्रवादी व भाजपालाही रसद पुरविण्याचे काम केले.

Web Title: NCP's victory due to planned propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.