राष्ट्रवादी काँग्रेसची गुगली

By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:10:43+5:302014-07-16T01:26:55+5:30

संतोष धारासूरकर , जालना पाच पैकी तीन जागा हिश्यास असताना सुद्धा आणखी एका जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करीत ‘राष्ट्रवादीचे’ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या.

NCP's googly | राष्ट्रवादी काँग्रेसची गुगली

राष्ट्रवादी काँग्रेसची गुगली

संतोष धारासूरकर , जालना
जिल्ह्यातील पाच पैकी तीन जागा हिश्यास असताना सुद्धा आणखी एका जागेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करीत ‘राष्ट्रवादीचे’ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वपक्षीय इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु काँग्रेसजनांत अस्वस्थता पसरवली आहे.
या जिल्ह्यात मुळातच कॉंग्रेस आघाडीत फारसे सख्य नाही. काँग्रेसजन समन्वयासह एकत्रीकरणाचे दर्शन, ऐक्याचे गोडवे गात आले आहेत. परंतु पडद्याआड काँग्रेसजनांत बेबनाव कायम राहिला आहे. अधूनमधून तो प्रगटसुद्धा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ व लोकसभा निवडणुका काँग्रेसजनांनी एकत्रितपणे लढविल्या खऱ्या परंतु आघाडीअंतर्गत धुसफूस सदैव जाणवली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेसजनांत प्रत्यक्ष लढतीपूर्वी शीतयुद्ध सुरु होईल हे अपेक्षितच आहे. ती साहजिक प्रतिक्रिया सुद्धा आहे. मात्र खुद्द ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या जिल्ह्याच्या दौऱ्यातून त्यास तोंड फोडले. ही गोष्ट राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.
या जिल्ह्यात घनसावंगी, बदनापूर व भोकरदन या तीन जागा आघाडीतून राष्ट्रवादीच्या, जालना व परतूर या दोन जागा काँग्रेसच्या हिश्यास आहे.दोन ठिकाणी राष्ट्रवादी व एका ठिकाणी काँग्रेसचे आमदार सत्तेवर आहेत. राजकीयदृष्ट्या तीन जागा राष्ट्रवादीच्या हिश्यात असताना आणखी एका जागेची मागणी म्हणजे तो राष्ट्रवादीचा वरचढपणाच आहे. परंतु खद्द प्रदेशाध्यक्षांनीच चौथ्या जागेचा प्रस्ताव सादर करा, अशी सूचना करीत मित्रपक्षांची डोकेदुखी वाढविली आहे.
या दौऱ्यापासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चौथ्या जागेचा विषय चर्चेला येणार हे स्पष्ट आहे. पण ती चौथी जागा नेमकी कोणती? असा सवाल उपस्थित होतो आहे. कारण जालना विधानसभेतून काँग्रेस प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे या जागेच्या मागणीसह सोडण्याचा विषय उद्भवत नाही. राहिला परतूर विधानसभा मतदार संघ. येथून काँग्रेस सलग तीन निवडणुकांतून पराभूत झाली.
गेल्या निवडणुकीत अन्वरबापू देशमुख, त्या आधी कदीरबापू देशमुख व गोपाळराव बोराडे हे काँग्रेस जन पराभूत झाले.
त्यामुळे या मतदार संघावर त्या निकषाच्या आधारेच ‘राष्ट्रवादी’स दावा ठोकता येईल हे खरे. परंतु गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार्याने अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आ. सुरेश जेथलिया यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्याचे विसरता येणार नाही. त्याही पलिकडे काही वर्षांपासून ते काँग्रेसच्या तंबूतच वावरत आले आहेत. काँग्रेसच्याच वाटेवर आहेत.
केवळ अधिकृत पक्षप्रवेश सोहळा बाकी आहे. त्यामुळेच सहयोगी सदस्य असणाऱ्या विद्यमान आमदाराची जागा काँग्रेसजन मित्रपक्षास म्हणजेच राष्ट्रवादीस सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांकडून आग्रहपूर्वक मागणी करण्यात आली नसतानाही चौथ्या जागेच्या मुद्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जागा मागणीचा प्रस्ताव
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडून स्थानिक पुढाऱ्यांना जागा मागणीचा प्रस्ताव सादर करण्याचा दिला जाणारा सल्ला आघाडीच्या धर्मास, ऐक्यास कितपत मानवणारा आहे, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेसजनांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता आणखीन एका जागेसाठीचा राष्ट्रवादीने काढलेला विषय आघाडीत अस्वस्थता निर्माण करणारा ठरेल असे चित्र आहे.

Web Title: NCP's googly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.