राष्ट्रवादीचे इच्छुक मुंबईला
By Admin | Updated: August 26, 2014 01:52 IST2014-08-26T01:19:08+5:302014-08-26T01:52:34+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या उद्या (मंगळवारी) मुंबईत मुलाखती होणार असून,

राष्ट्रवादीचे इच्छुक मुंबईला
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांच्या उद्या (मंगळवारी) मुंबईत मुलाखती होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतील इच्छुक आजच रवाना झाले. अनेकजण सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचल्याची माहिती मिळाली.
औरंगाबाद जिल्ह्यातील मुलाखती दुपारी ४ वाजेपासून सुरू होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी दिली. तेही मुंबईत पोहोचले आहेत. उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या वेळी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. उद्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण होतील. सद्य:स्थितीत औरंगाबाद जिल्ह्यात पैठणमध्ये संजय वाघचौरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. हा आकडा यंदा तीनपर्यंत जाण्यासाठी पक्षाचे प्रयत्न आहेत. औरंगाबाद मध्य आणि गंगापूर या दोन मतदारसंघांत पक्षाने त्यासाठी तयारी केली आहे. शिवाय आघाडीच्या जागा वाटपात वैजापूरसाठी आग्रह राहणार असल्याचेही संकेत आहेत.
पक्षातील इच्छुकांमध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आठ जण इच्छुक आहेत. त्यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल कदीर मौलाना, विनोद पाटील, मनमोहनसिंग ओबेरॉय, डॉ. गफ्फार कादरी, अफसर खान आदींचा समावेश आहे. राज्यमंत्री फौजिया खान यांचेही नाव चर्चेत आहे.
मात्र, त्यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज भरलेला नाही. त्यांनी मागणी केलेली नाही. मात्र, त्यांना पक्षाकडून उमेदवारी अपेक्षित आहे. पैठणमधून सहा जण इच्छुक आहेत. विद्यमान आमदार संजय वाघचौरे यांच्यासह तुषार शिसोदे, अनिल जाधव, अप्पासाहेब निर्मळ, कांतराव औटे आदींचा समावेश आहे. गंगापूर मतदारसंघात कृष्णा पाटील डोणगावकर, विलास चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर निळ, राजू वरकड, हरिभाऊ ढवण, नासेर पटेल आदी इच्छुक आहेत. वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात नसला तरी वैजापूर मतदारसंघातून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे एकमेव इच्छुक आहेत.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्य:स्थितीत कोट्यात नसलेल्या फुलंब्री मतदारसंघात चार जण इच्छुक आहेत. त्यामध्ये पांडुरंग तांगडे पाटील, नितीन देशमुख आदींचा समावेश आहे. कन्नडमधून सात जण इच्छुक आहेत. यामध्ये उदयसिंग राजपूत, भाऊसाहेब काजे, प्रसन्न किशोर पाटील यांचा समावेश आहे. सिल्लोडमधून अरुण शिंदे, सुधाकर पाटील यांच्यासह चार जणांचा समावेश आहे.
अनेक जण इच्छुक असलेल्या मतदारसंघात काही प्रमुख इच्छुकांनी स्वत:च्या मर्जीतील एक- दोन इच्छुक उमेदवार तयार केले आहेत. मला उमेदवारी देणार नसल्यास ‘अमुक’ इच्छुकाला तिकीट द्या, अशी मागणी ते उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या वेळी करतील. त्यामुळे काही ठिकाणी डमी इच्छुक तयार झाले आहेत. शिवाय राजकीय वलयात राहण्यासाठीही काही जण इच्छुक असल्याचे समजते.