राष्ट्रवादी ९० जागी स्वबळावर
By Admin | Updated: April 7, 2015 01:28 IST2015-04-07T01:12:37+5:302015-04-07T01:28:48+5:30
औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून,

राष्ट्रवादी ९० जागी स्वबळावर
औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून, सोमवारी दुपारपासून निश्चित केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटपही सुरूकेले आहेत. सुमारे ९० जागांवर उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली.
काँग्रेसशी होणाऱ्या आघाडीत बिघाडी झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या असून, मंगळवारी सर्वच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पक्षाचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष विनोद पाटील, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होऊन त्यामध्ये पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांंना एबी फॉर्म वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारपासून एबी फॉर्मचे वाटपही सुरूकरण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. आणखी जागांवर एबी फॉर्म देण्याचे काम बुधवारी सकाळी होणार आहे.
शिवसेना- भाजप तसेच एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली पाहिजे, असा विचार सुरू होता. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ.सतीश चव्हाण या मंडळींनी काँग्रेससोबत आघाडीशी दोन ते तीन वेळा बोलणीही केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही चर्चा झाली. रविवारी रात्रीपर्यंत आघाडी होण्याचे संकेत मिळत नव्हते. दोन्ही पक्षांनी रविवारी रात्रीच निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासंबंधी सूचना देण्यास सांगितले होते. त्यामुळे आघाडी झाली नसल्याचे सोमवारी सकाळी स्पष्टपणे पुढे आले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मचे वाटपही सुरू केले.
आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही जास्तीत जास्त जागा लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाने सर्वच वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
४आमच्याकडे सर्व ११३ वॉर्डासाठी उमेदवार आहेत. मात्र, ज्याठिकाणी पक्षाची फारशी शक्ती नाही, त्याठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही. ज्या वॉर्डात आमचा उमेदवार नसेल तेथे काय करायचे हे नंतर ठरविण्यात येईल.
पक्षातर्फे मंगळवारी आणि बुधवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवार निवड समितीमार्फत ज्यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत, त्यातील बहुसंख्य उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षातर्फे ‘आधी उमेदवारी; नंतर यादी’ असा नवा फॉर्म्युला अंमलात आणण्यात आला.