महाविद्यालयांतही राष्ट्रगीत

By Admin | Updated: July 22, 2014 00:37 IST2014-07-22T00:32:53+5:302014-07-22T00:37:57+5:30

अशोक कारके , औरंगाबाद शाळेत रोज सकाळी होणारे राष्ट्रगीत महाविद्यालयांतही म्हटले जावे, असे आदेश जून २०१४ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ आणि उच्चशिक्षण उपसंचालकांना दिले होते.

National Geet | महाविद्यालयांतही राष्ट्रगीत

महाविद्यालयांतही राष्ट्रगीत

अशोक कारके , औरंगाबाद
शाळेत रोज सकाळी होणारे राष्ट्रगीत महाविद्यालयांतही म्हटले जावे, असे आदेश जून २०१४ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ आणि उच्चशिक्षण उपसंचालकांना दिले होते. मात्र, दोन्ही प्रशासनाकडून हे आदेश आजही महाविद्यालयांना मिळालेले नाहीत. यामुळे आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीच होऊ शकलेली नाही.
रोज सकाळी पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्याची भावना निर्माण व्हावी यासाठी शाळेत विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीताचे समूहगान होते. ११ वीपासून महाविद्यालयांत राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे करण्यात आलेले नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १२ जून २०१४ रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत रोज राष्ट्रगीत व्हावे, असे आदेश दिले असले तरी ते महाविद्यालय सुरू झाल्यानंतरही त्यांना देण्यात आलेले नाहीत. मराठवाड्यात उच्चशिक्षण उप संचालक विभागांतर्गत ११३ अनुदानित आणि २५२ विनाअनुदानित महाविद्यालये असून ही सर्व महाविद्यालये या आदेशापासून अनभिज्ञ आहेत. यामुळे तेथे राष्ट्रगीत म्हटले जात नाही. लोकलेखा समितीचे सदस्य आ. नाना पटोले यांनी ११ नोंव्हेबर २०१३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेची भावना निर्माण व्हावी यासाठी ‘जन- गण- मन’ हे राष्ट्रगीत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू करावे, अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून महाविद्यालयात रोज राष्ट्रगीत व्हावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.
अद्याप आदेश नाहीत
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जन- गण- मन रोज महाविद्यालयात व्हावे असा शासनाचा आदेश आम्हाला अद्यापही मिळालेला नाही, असे उच्चशिक्षण उप संचालक डॉ. महंमद फय्याज यांनी सांगितले.
राष्ट्रद्रोहाची कारवाई करावी
तरुणांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून शासनाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत सक्तीचे केले आहे. शाळेप्रमाणे महाविद्यालयात राष्ट्रगीत होण्याच्या शासन निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; पण शासनाचा आदेश महाविद्यालयांना न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाची कारवाई करावी.
- तुकाराम सराफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेना.
राष्ट्रीय सणाला होते राष्ट्रगीत
स्वातंत्र्य दिन (१५ आॅगस्ट) आणि प्रजासत्ताकदिनीच (२६ जानेवारी) महाविद्यालयात जन- गण- मन होते, रोज होत नाही. आम्हाला कोणतेही आदेश मिळाले नाहीत.
- पी. एस. आडवाणी, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
आदेश नाहीत
महाविद्यालयात राष्ट्रगीत नियमित घेण्यात यावे असा, आदेश मिळाला नाही; पण आम्ही रोज महाविद्यालयात सकाळी १०.३० वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हणतो. यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची सवय लागली आहे.
-प्राचार्य, उल्हास शिऊरकर, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय

Web Title: National Geet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.