नाथ मंदिर राहणार अंशतः उघडे; भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 19:24 IST2021-03-31T19:23:43+5:302021-03-31T19:24:51+5:30
Nathshashti Paithan नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या व लाखो वारकरी पैठण नागरीत दाखल होत असतात.

नाथ मंदिर राहणार अंशतः उघडे; भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पैठण : नाथषष्ठी दरम्यान येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पैठण येथील नाथांचे मंदीर पूर्णतः उघडे ठेवू नका असे आदेश जिल्हा प्रशासनाने संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळास दिले आहेत. पैठण येथील नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. असे असले तरी वारकरी भाविक मोठ्या संख्येने पैठणला हजेरी लावतात हा गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने भाविकासाठी मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे मुखदर्शनालाही मुकावे लागणार असल्याने वारकरी संप्रदायात मात्र मोठी नाराजी पसरली आहे.
पंढरपूर आषाढी नंतर नाथषष्ठीच्या वारीचे मोठे महत्त्व वारकरी संप्रदायात आहे. नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या व लाखो वारकरी पैठण नागरीत दाखल होत असतात. यंदा मात्र प्रशासनाने अगोदरच यात्रा रद्द केल्याने वारकऱ्यांनी दिंड्याचे नियोजन रहीत केलेले आहे. तुकाराम बीजेस नाथांच्या वाड्यातील पवित्र राजणाची विधीवत पूजा करून नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला आहे. त्यातच जिल्ह्यातील लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यात आल्याने नाथषष्ठीसाठी वाहनाने वारकरी येण्याच्या तयारीत आहेत. नाथषष्ठीची वारी खंडीत होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने दिंड्यातील वारकरी दर्शनासाठी गतवर्षी आले होते त्याच प्रमाणे यंदाही वारकरी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मंदिर पूर्णतः उघडे ठेवू नका असे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त व नाथवंशजांना आज दिले आहेत.