परभणी : तालुक्यातील झरी येथे सुरु असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी १५ जानेवारी रोजी केली. यावेळी त्यांनी नाम नदीच्या खोलीकरणाची पाहणी करुन हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्त दांगट हे परभणी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यानिमीत्त दांगट यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास झरी येथील कामांची पाहणी केली. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कपाळे, प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख यांची उपस्थिती होती. मागील दोन महिन्यांपासून झरी परिसरात नाम नदीचे खोलीकरण व रुंदीकरण काम सुरु आहे. नाम नदीचे ७ किमी अंतरापैकी ३ किमीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या कामाची पाहणी करुन दांगट यांनी समाधान व्यक्त केले. काम चांगले सुरु असून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. यावेळी परिसरातील सात ते आठ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थांनी, कांतराव देशमुख यांनी दुधना नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी दांगट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)
नाम नदीच्या खोलीकरणाची दांगट यांनी केली पाहणी
By admin | Updated: January 15, 2016 23:44 IST