गोदा स्वच्छतेसाठी नांदेडकर सरसावले
By Admin | Updated: June 11, 2014 00:23 IST2014-06-10T23:56:50+5:302014-06-11T00:23:09+5:30
नांदेड : गोदा मैली झाल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे़ तिच्या स्वच्छतेसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रमही घेण्यात आले़

गोदा स्वच्छतेसाठी नांदेडकर सरसावले
नांदेड : गोदा मैली झाल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे़ तिच्या स्वच्छतेसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रमही घेण्यात आले़ त्यात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नांदेडकरांनी दाखविलेला उत्साह अवर्णनीय होता़ श्रमदानातून गोळा झालेल्या १५ टन कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे पाहताच अनेकांना जणू श्रमपरिहारच झाल्याची भावना निर्माण झाली होती़
शहरासाठी ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक देणगीची समृद्धी लाभलेल्या गोदावरी नदीपात्राची स्वच्छता करुन सोमवारी नगीनाघाट परिसरात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला़ जिल्हा प्रशासन, मनपा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, गुरुद्वारा बोर्ड, लंगरसाहिब गुरुद्वारा, नांदेड नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या उपक्रमात १५ टन घाण श्रमदानाच्या माध्यमातून गोदावरीच्या बाहेर काढण्यात आली़
सकाळच्या आल्हाददायक वातावरणात गोदावरीच्या स्वच्छतेसाठी हजारो हात झटत होते़ त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि कृतज्ञतेचे भावही स्पष्टपणे झळकत होते़
त्यात नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण यांनी उत्स्फूर्तपणे या स्तुत्य उपक्रमात खारीचा वाटा उचलला़
यावेळी संतबाबा बलविंदरसिंघजी, जिल्हाधिकारी धीरजकुमार, आयुक्त जी़ श्रीकांत, वनपरिक्षेत्र अधिकारी सुजय दोडल, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक रणजितसिंघ चिरागिया, उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहाय्यक आयुक्त डॉ़ विजयकुमार मुंडे, एस़ टी़ मोरे, नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, गोविंद बिडवई, डॉ़मिर्झा बेग, कोतुलवार, शेख, मनीषा अय्यर, नेचर क्लबच्या अध्यक्षा अरुंधती पुरंदरे, अतिंद्र कट्टी, श्रीनिवास औंधकर यांची उपस्थिती होती़
यावेळी वड, पिंपळ, कांचन, उंबर, आवळा आदी ५० झाडे लावण्यात आली़ या झाडांच्या देखभाल व सुरक्षिततेची जबाबदारी गुरुद्वारा लंगर साहिब व गुरुद्वारा बोर्ड यांनी स्वीकारली़ (प्रतिनिधी)
पर्यावरण दिनानिमित्त नांदेडकरांचा स्तुत्य उपक्रम
पंधरा टन कचरा आणि घाण काढली पात्राच्या बाहेर
नदीकिनारी वृक्षारोपणही केले