नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे सहा दिवस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 20:21 IST2016-03-19T20:02:27+5:302016-03-19T20:21:09+5:30
नांदेड : नांदेड-पुणे रेल्वे प्रवास सोयीचा होणार असून आता शनिवार वगळता दररोज नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे धावणार आहे.

नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे सहा दिवस धावणार
नांदेड : नांदेड-पुणे रेल्वे प्रवास सोयीचा होणार असून आता शनिवार वगळता दररोज नांदेड-पुणे रेल्वे लातूरमार्गे धावणार आहे. तसेच मनमाडमार्गे धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकही पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याने नांदेडच्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
खा. चव्हाण यांनी रेल्वे अर्थसंकल्पावर बोलतानाही प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात यावे, अशी मागणी लावून धरली होती. तसेच सदर प्रवाशांच्या सोयीचे वेळापत्रक तयार न करण्यामागे स्थानिक प्रशासनाचे व खासगी बस यंत्रणेचे मधुर संबंध असल्याचे ठासून सांगितले होते.
दरम्यान त्यांच्या निवेदनासंदर्भाने रेल्वे मंत्रालयाने तत्काळ पावले उचलली. आता लातूरमार्गे सहा दिवस रेल्वे धावेल. शिवाय ती पुण्यापर्यंतच नव्हे, तर पनवेलपर्यंत धावणार आहे.
त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय झाली आहे. या रेल्वेशिवाय पुण्याला जाण्यासाठी मंगळवारी व रविवारी मनमाडमार्गे धावणारी रेल्वे पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. (प्रतिनिधी)