जीवन गौरव पुरस्कारासाठी पाच जणांची नावे जाहीर
By Admin | Updated: August 20, 2014 00:55 IST2014-08-20T00:43:20+5:302014-08-20T00:55:58+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वर्धापन दिन २३ आॅगस्ट रोजी शनिवारी मोठ्या थाटात साजरा केला जाणार

जीवन गौरव पुरस्कारासाठी पाच जणांची नावे जाहीर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वर्धापन दिन २३ आॅगस्ट रोजी शनिवारी मोठ्या थाटात साजरा केला जाणार असून, त्या दिवशी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. विजय भटकर, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण, सिंचन व कृषी क्षेत्रात विजयअण्णा बोराडे, आरोग्य व संशोधन क्षेत्रातील डॉ. हिम्मतराव बावस्कर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले सामाजिक कार्यकर्ते एल. आर. बाली या पाच महनीय व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
यासंदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, विद्यापीठाची प्रतिमा देशपातळीवर उंचावण्यासाठी या वर्षापासून जीवन गौरव पुरस्काराची परंपरा सुरू करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचे संपूर्ण देशभर कार्यक्षेत्र गृहीत धरले जाणार आहे. पुढे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कार्यक्षेत्र समजले जाईल. २३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा. विद्यापीठ नाट्यगृहात हा समारंभ होईल. त्यामध्ये पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मानपत्र, स्मृतिचिन्ह दिले जाईल. या विद्यापीठाकडून मान्यवरांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले जाईल. त्यांच्या सूचना व सल्ल्यानुसार विद्यापीठाचा विकास साधला जाईल. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान विद्यापीठ परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे अभियान राबविले जाईल.