नामविस्तार दिनी उसळला जनसागर
By Admin | Updated: January 15, 2016 00:04 IST2016-01-14T23:38:51+5:302016-01-15T00:04:55+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी प्रवेशद्वारावर महाराष्ट्रातील भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता.

नामविस्तार दिनी उसळला जनसागर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी प्रवेशद्वारावर महाराष्ट्रातील भीमसैनिकांचा जनसागर उसळला होता. यावेळी आबालवृद्धांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास व नामांतर शहीद स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दलित चळवळीसह परिवर्तनवादी विचारांच्या नागरिकांसह अभिवादनासाठी लाखोंची गर्दी सकाळपासून सुरू होती.
भडकलगेट, क्रांतीचौक, टीव्ही सेंटर, हर्सूल, चिकलठाणा, मुकुंदवाडी, भीमनगर, भावसिंगपुरा, सातारा- देवळाई, विटखेडा, जवाहर कॉलनी, गारखेडा परिसर, हनुमाननगर, पुंडलिकनगर, रमानगर, बापूनगर, यशोधरा कॉलनी, आंबेडकरनगर, हडको आणि वाळूज परिसरातूनही रॅलीसह येऊन महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन केले. अ. भा. समता सैनिक दलाने लष्करी थाटात मानवंदना दिली. यावेळी विंग कमांडर डी. व्ही. खिल्लारे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय दलित पँथरने लक्ष्मण भुतकर यांच्या नेतृत्वाखाली वाहन रॅली काढली.
भारतीय दलित कोब्रातर्फे रॅली काढून अभिवादन व अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. ओबीसी जनजागरण समिती, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, संविधान बचाव समितीच्या वतीनेही रॅली काढण्यात आली.
वैचारिक शिदोरीवर भर...
विद्यापीठ परिसराला वाचक चळवळीचे स्वरूप निर्माण होऊ लागले आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, या बाबासाहेबांच्या शिकवणीवर त्यांचे अनुयायी वाटचाल करीत आहेत.
विद्यापीठगेटपासून ते आंबेडकर लॉ कॉलेज व मिलिंद होस्टेलच्या दुतर्फा रस्त्यावर ‘बुद्ध, भीमगीतांच्या ध्वनिफिती व पंचशील बुद्धवंदनेपासून ते नामांतरावर आधारित चळवळीची विविध पुस्तके, संविधानाची प्रत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाजलेली भाषणे, छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, शाहू महाराज, रमाई, सावित्रीबाई फुले यांच्यावरील परिवर्तनवादी पुस्तकांचे स्टॉल होते.
मिठाई वाटप
भारतीय दलित पँथरचे संजय जगताप यांनी जिलेबी वाटप करून आनंद साजरा केला. किशोर गडकर, अनिल उगले, शैलेश बागूल, विक्रम जगताप, रमेश दामोदर, प्रमोद कोथमिरे, दशरथ म्हस्के, राहुल वाकेकर, रमेश अहिरे, अरुण घोरपडे, विलास तुपे आदींची उपस्थिती होती.