Namantar Andolan : अंगावर १५० घाव झेलत जनार्दन मवाडे शहीद झाले; पण... : ताईबाई मवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:53 IST2019-01-14T15:52:45+5:302019-01-14T15:53:11+5:30
लढा नामविस्ताराचा : सुगाव, जि. नांदेड येथील जनार्दन मवाडे हे नामांतर लढ्यातील पहिले शहीद. त्यांच्या पत्नी ताईबाई म्हणतात, हल्लेखोरांपैकी एकानं घर जाळत असताना माझ्याच पदरानं माझं कुंकू पुसलं. घर जळत होतं आणि माझ्या तीन मुलांना जीव मुठीत धरून उतरंडीत लपवून ठेवावं लागलं. हा अंगावर शहारे आणणारा प्रसंग मी कशी विसरू शकेन?

Namantar Andolan : अंगावर १५० घाव झेलत जनार्दन मवाडे शहीद झाले; पण... : ताईबाई मवाडे
- स. सो. खंडाळकर
४ ऑगस्ट १९७८ चा तो दिवस. अजूनही अंगाचा थरकाप उडतो. ५०० हल्लेखोर आणि माझे पती जनार्दन मवाडे एकटे लढताहेत आणि अंगावर १५० घाव झेलून बाबासाहेबांच्या नावासाठी शहीद होताहेत... हा प्रसंग किती विसरावं म्हटलं तरी मी विसरू शकत नाही. आठवणींनी कधी डोळे पाणावतात, हेसुद्धा कळत नाही...’ अत्यंत भावनिक होऊन जनार्दन मवाडे यांच्या पत्नी ताईबाई (वय ७०) ‘लोकमत’जवळ आपलं मन मोकळं करून घेत होत्या.
नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताईबार्इंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक होईल का? असा सवाल उपस्थित केला आहे. १४ जानेवारी २०१६ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. बी.ए. चोपडे यांनी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र सभागृहात आम्हाला बोलावून आमचा सत्कार केला होता व त्याच कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठात नामांतर शहीद स्मारक उभारण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात येईल, असं सांगितलं होतं.
हे वृत्त त्यावेळी ‘लोकमत’सह इतरही वर्तमानपत्रांनी ठळक छापलं होतं; परंतु आता २०१९ उजाडलं तरी काहीच हालचाल दिसत नाही. याची मला आता चीड येत आहे आणि या मागणीसाठीही संघर्ष करण्याची वेळ यावी, याचं दु:ख होत आहे, असे नमूद करीत ताईबार्इंनी इशारा दिला आहे की, जर लवकर नामांतर शहीद स्मारक झालं नाही, तर मी कुलगुरूंच्या दालनातच बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि तिथंच शेवटचा श्वास घेण्याची माझी इच्छा आहे. ज्या विद्यापीठासाठी माझे पती शहीद झाले, त्यांच्यासह अन्य शहिदांचं स्मारक होऊ नये, ही बाब मला लाजिरवाणी वाटते, असे त्या त्वेषाने म्हणाल्या.
शहिदांच्या परिवाराकडे पुढाऱ्यांनीही लक्ष दिले नसल्याची खंत ताईबार्इंनी व्यक्त केली. सुगाव येथे जनार्दन मवाडे यांचं स्मारक व्हावं, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळं नव्या पिढीला नामांतराचा संघर्ष, त्यातील बलिदान कळू शकेल; पण याकडेही कुणाचं लक्ष नाही याचंही खूप दु:ख वाटतं, असं ताईबाई रागारागातच सांगत होत्या.