नालेसफाईत मनपा नापास

By Admin | Updated: June 23, 2016 01:27 IST2016-06-23T00:58:20+5:302016-06-23T01:27:59+5:30

औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाई करावी, असे आदेश दिलेले असतानाही वॉर्ड अभियंत्यांनी सफाईचे नुसते ढोंग रचल्याचे विदारक सत्य बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले.

Nalashef Natha Napas | नालेसफाईत मनपा नापास

नालेसफाईत मनपा नापास


औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाई करावी, असे आदेश दिलेले असतानाही वॉर्ड अभियंत्यांनी सफाईचे नुसते ढोंग रचल्याचे विदारक सत्य बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. अत्यंत थातुरमातुर स्वरूपातील नालेसफाईवर तब्बल १ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. येणाऱ्या आठ दिवसांत आणखी चांगली सफाई करावी, असे आदेश सभापती मोहन मेघावाले यांनी दिले.
सभापतीपदी मोहन मेघावाले यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीलाच नालेसफाईच्या मुद्यावर नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. यावेळी नालेसफाईचा आढावा घेण्यात आला.
वॉर्ड अभियंता प्रशांत विटेकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांचे ‘समाधान’ झाले नाही. नाले साफ करण्यात येत असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. मात्र, आता घटनास्थळावर परिस्थिती विदारक असून, प्रशासन अनुचित घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल रावसाहेब आमले, नितीन चित्ते, राज गौरव वानखेडे, विकास एडके, समिना शेख, मनीषा मुंडे, कैलास गायकवाड यांनी केला. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी खुलासा केला की, शहरात ६७ किलोमीटरचे मोठे नाले आहेत. या नाल्यांची संपूर्ण सफाई करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, मनपाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नाही. जिथे गंभीर परिस्थिती आहे तेथेच सफाई करण्यात येते. अनेक ठिकाणी नालेसफाई झालेलीच नसतानाही मनपा अधिकाऱ्यांनी सफाई झाल्याचे सांगितल्याने नगरसेवक अधिक आक्रमक झाले. सभापती मोहन मेघावाले यांनी येणाऱ्या आठ दिवसांत नालेसफाई करा, असे आदेश दिले.

Web Title: Nalashef Natha Napas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.