नाल्यांचे पाणी शाळेच्या आवारात
By Admin | Updated: July 21, 2014 00:20 IST2014-07-20T23:48:37+5:302014-07-21T00:20:25+5:30
माजलगाव : शहरातील सन्मित्र कॉलनी भागासह विविध भागांतील पाणी रस्त्यावर सोडले जात आहे़ तसेच नाल्याही वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे़

नाल्यांचे पाणी शाळेच्या आवारात
माजलगाव : शहरातील सन्मित्र कॉलनी भागासह विविध भागांतील पाणी रस्त्यावर सोडले जात आहे़ तसेच नाल्याही वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ शहरातील अनेक भागात हीच परिस्थिती असून रस्त्यावरील घाण पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ नाल्यातील पाणी शाळेच्या आवारात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे़
शहरातील जुने बसस्थानक परिसरात मोंढा भाग, आझाद नगर, आंबेडकर चौक, आदी भागातील नाल्यातील पाणी हे शहराच्या मुख्य रस्त्यावरील नालीमधून थेट सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे़ या मुख्य रस्त्याच्या कडेला सन्मित्र कॉलनी भागात छत्रपती विद्यालय आहे़ मुख्य रस्त्यावरील नाल्या दोन वर्षापासून स्वच्छ न केल्यामुळे नाल्यांमध्ये कचरा साचला आहे़ या कचऱ्याला अडून पाणी रस्त्यावर येऊन शाळेच्या आवारात साचत आहे़ शाळेच्या आवारात मागील दोन वर्षापासून हे पाणी असे साचत आहे़ ही नाली कोणी स्वच्छ करावी, याबाबत वाद सुरु आहे़
सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर पालिका यांच्यातील वादामुळे या नालीची सफाई दोन वर्षापासून रखडली आहे़ याचा त्रास मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे़ विशेष म्हणजे याच भागातून शाळेतील विद्यार्थी जात असल्याने त्यांना येथे साचलेल्या दुर्गंधीचा सामना करतच शाळेला जावे लागत आहे़ लहान मुलांसह वृध्द, महिला यांनाही याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे़
मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ करुन शाळेच्या आवारात येणारे घाणी पाणी थांबवावे यासाठी मुख्य रस्त्यावर काही दिवसापूर्वी रास्ता रोको करण्यात आला़ मात्र याची दखल अद्यापही नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने न घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे़
शाळेच्या आवारात येणारे घाण पाणी थांबवावे यासाठी मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ करण्यात याव्यात यासाठी आम्ही पालिका व सा़ बां़ विभागाला अनेक वेळा लेखी व तोंडी कळविले आहे़ मात्र त्याची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही़ शाळेच्या आवारात घाणी पाणी साचत असल्याने डासाची उत्पत्ती होत असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक नीळकंठ जाधव यांनी सांगितले़ विद्यार्थ्यांमधूनही स्वच्छतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे़ स्वच्छता करण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)