एन-७ जलकुंभाला रणरागिनींचा वेढा

By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:42:18+5:302014-09-04T00:54:56+5:30

औरंगाबाद : मिसारवाडी, आंबेडकरनगर भागांत टँकर पोहोचले नसल्याने काही महिलांनी एन-७ जलकुंभावर आंदोलन करून आज स्वत: टँकर नेले.

N-7 siege of Ranaragini in the water tower | एन-७ जलकुंभाला रणरागिनींचा वेढा

एन-७ जलकुंभाला रणरागिनींचा वेढा

औरंगाबाद : मिसारवाडी, आंबेडकरनगर भागांत टँकर पोहोचले नसल्याने काही महिलांनी एन-७ जलकुंभावर आंदोलन करून आज स्वत: टँकर नेले. रणरागिनींनी जलकुंभाला वेढा देऊन तेथील यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
वसाहतींचे पत्ते, मार्ग आणि टँकर पाठविण्याच्या वेळा माहिती नसल्यामुळे कंपनीने नेमलेले टँकर वेळेत जात नाहीत. गौरी गणपतींचा सण आणि त्यातच टँकरने पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली. त्या उद्रेकातूनच मिसारवाडीतील महिलांनी एन-७ जलकुंभावर आंदोलन केले. १ सप्टेंबरपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे दिली आहे. गुंठेवारी वसाहतींत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे धोरण कंपनीने अजून तरी ठरविलेले नाही.
अधिकाऱ्यांनी गप्प बसविले
स्थायी समिती सदस्य संजय चौधरी यांनी आजच्या बैठकीत गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकर येत नसल्याचा मुद्दा लोकमतच्या वृत्ताचा आधार घेत उपस्थित केला. मात्र, शहर अभियंता एस.डी.पानझडे यांनी त्यांना मोघम उत्तर देऊन गप्प केले.
शहागंज जलकुंभावर गनमॅन
शहागंज जलकुंभावर समांतरच्या ठेकेदाराने अक्षरश: बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमले आहेत. जलकुंभांवर बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमून नागरिकांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी कंपनीने निर्णय घेतला आहे. दरम्यान, नगरसेवक मीर हिदायत अली म्हणाले, हे चुकीचे आहे.

Web Title: N-7 siege of Ranaragini in the water tower