औरंगाबाद : कोणाला पंढरपूरच्या दिंडीत विठ्ठल दिसतो, कोणी दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानतात. अहो, ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ असे म्हणत औरंगाबादेत रविवारी ७०० महिलांनी एकत्र येत ३ तासात ६५ हजार गूळ-शेंगदाण्याचे लाडू तयार केले. हे लाडू आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपुरात वारकऱ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
आपणास पंढरपूरला जाता आले नाही तरी आपली सेवा पंढरपुरात पोहोचावी, या भावनेतून रविवारी जवाहर कॉलनीतील विश्वशंकर मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता ७०० महिला जमा झाल्या होत्या. ५१ हजार लाडू तयार करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. दुपारी २ वाजेपर्यंत प्रत्यक्षात ६५ हजार लाडू बनले. यासाठी १ हजार किलो शेंगदाणे व १ हजार किलो गुळाचा वापर करण्यात आला. हॉलमध्ये गटागटाने महिला-तरुणी बसून लाडू वळत होत्या. व्यासपीठावर मध्यभागी श्री विठ्ठलाची प्रतिमा, डाव्या बाजूला संत ज्ञानेश्वर व उजव्या बाजूला संत तुकारामांची प्रतिमा सर्वांचे आकर्षण ठरल्या. तत्पूर्वी सकाळी १० वाजता न्यू शांतीनिकेतन कॉलनी, भानुदासनगर या भागातून दिंडी काढण्यात आली. या उपक्रमासाठी आयोजक लतिका सुरवे, उमाकांत वैद्य, दीपक हर्सूलकर, खंडू थोरात, अर्जुन पवार, सतीश साकडे, शंकर पारसवाणी आदींनी परिश्रम घेतले.
११ वर्षांपासून पंढरपुरात लाडूवाटपआषाढी एकादशीनिमित्त दिंडीतील वारकऱ्यांसाठी लाडू तयार करण्याचे हे ११ वे वर्ष आहे. या उपक्रमाची सुरुवात ५ हजार लाडूंपासून झाली होती. मागील दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडला होता.- मनोज सुरवे, आयोजक