विहिरीत पडून माय-लेकींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:47+5:302021-02-05T04:09:47+5:30
सरपंच रियाज पटेल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव दांडगा येथे इरफान शेख आपल्या पत्नी, मुलींसह राहतात. इरफान यांचा जनावरे खरेदी-विक्रीचा ...

विहिरीत पडून माय-लेकींचा मृत्यू
सरपंच रियाज पटेल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव दांडगा येथे इरफान शेख आपल्या पत्नी, मुलींसह राहतात. इरफान यांचा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने ते नेहमीप्रमाणे बुधवारी बिडकीन आठवडा बाजारात वडिलांसह गेले होते. इरफान यांची पत्नी आयेशा इरफान शेख (२३) या शेतवस्तीवरील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत अडीच व तीन वर्षांच्या दोन्ही मुली होत्या. विहिरीतून पाणी शेंदताना अडीच वर्षांची जिनजाला ही त्यांच्या कडेवर होती. यावेळी तोल जाऊन आयेशा या जिनजालासह विहिरीत पडल्या. यानंतर आईला पाहण्यासाठी गेलेली आलीया देखील विहिरीत पडली. या घटनेत तिघींचाही बुडून मृत्यू झाला.
सायंकाळी आयेशा यांचे सासरे घरी आल्यानंतर त्यांना सून व मुली दिसत नसल्याने त्यांनी शेतात शोध घेतला. तेव्हा त्यांना विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी ही बाब तत्काळ सरपंच रियाज पटेल व पाचोड पोलिसांना सांगितली. यावेळी सरपंच व पाचोड पोलीस स्टेशनचे सपोनि अतुल येरमे व पोलीस जमादार आबासाहेब कणसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणांच्या मदतीने तिघींचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, बिट जमादार गोरखनाथ कणसे व मादने पुढील तपास करीत आहेत.