मुस्लिम, दलित मतदारांचा भाजपालाच कौल
By Admin | Updated: May 18, 2014 00:47 IST2014-05-18T00:29:33+5:302014-05-18T00:47:06+5:30
दिनेश मुळवे , बीड लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराने मुसंडी मारली.

मुस्लिम, दलित मतदारांचा भाजपालाच कौल
दिनेश मुळवे , बीड लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराने मुसंडी मारली. येथील मुस्लिम, दलित मतदारसंघ आपल्याच वळचणीला असल्यागत गप्पा मारणार्यांची या निकालाने मात्र नशा उतरविली. या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनीही भाजपलाच साथ दिल्याचे निकालानंतर समोर आले. बीड विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व दलित समाजातील मते निर्णायक आहेत. यामुळे येथील मुस्लिमबहुल वस्तींमध्ये ‘मुस्लिम’ नेत्यांच्या जंगी सभा झाल्या. भाजपचे सरकार आल्यास मुस्लिम, दलित समाजावर कसे अन्याय होतील, याची भीतीही व्यक्त करण्यात आली. मात्र, मतदारांनी या भीतीला भीक घातली नाही. गत पाचवर्षातही येथे भाजपचे खासदार होते, कोणत्या मुस्लिम व दलित व इतर समाजावर भाजपकडून अन्याय झाला? याचा विचार करावयास भाजप उमेदवाराने भाग पाडले. शेवटी झाले तेच हा समाज मोठ्या संख्येने भाजप उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. बीड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या प्रचाराने ढवळून निघाला होता. या प्रचारात कार्यकर्तेच नेते झाल्याने याचा फटका बसला. याउलट महायुतीचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू होता. मधल्या काळात शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे महायुतीसोबत आल्यानेही याचा फायदा झाला. कारण बीडमध्ये शिवसंग्रामची ताकद परिणामकारक आहे. केंद्र व राज्यातही कॉँग्रेस आघाडीची सत्ता होती. मात्र सत्ताधारी बीडकरांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी झाले. यामुळे बीडकरांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकला. वास्तविक बीडमध्ये भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा कमी आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत सुरुवातीला शिवसैनिकांत काहीशी नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यात गोपीनाथ मुंडे यांची हातोटी कामी आली. शिवसैनिकांनी आलपी मरगळ झटकत वाडी-वस्त्यांवर प्रचाराची राळ उडवून दिली. यामुळे बीडमधून ५० हजारांची ‘लीड’ राष्टÑवादीला मिळवून देऊ, अशी वल्गना करणार्यांना मतदारांनी तोंडावर पाडले. गेल्या पाच वर्षांपासून बीडमधून राकॉँचे नेते, पदाधिकारी आपल्या गाडीच्या काचा कधी खाली करून जात नाहीत. रस्त्याने कोण चालले, त्याच्या वेदना काय? याच्याशी त्यांना देणे-घेणे उरले नव्हते. यामुळे सामान्यांची व राष्टÑवादीची ‘नाळ’ काही जुळलीच नाही. याचा फटका निवडणुकीत बसला. बीडमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी स्वत: फिल्डींग लावली, याचा उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. ‘अल्पसंख्यकांना भाजप-शिवसेनेची भीती दाखवा व मते मिळवा, हा राकॉँचा फंडा या निवडणुकीत कामाला आला नाही. याला मतदारांनी न बळी पडता भाजप उमेदवाराला चक्क चार हजार मतांची लिड दिली. बीड मध्ये राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाडल्याचा कांगावा केला, मात्र उपयोग झाला नाही. याउलट भाजप नेत्यांनी सामान्यांच्या घरापर्यंत जाऊन आपला प्रामाणिकपणा दाखवून पुन्हा संधी देण्याची मागणी केली, याला मतदारांनीही मनापासून साथ दिली. बीड पालकमंत्री तथा विधानसभा सदस्य राष्टÑवादीचे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन बाजार समिती, नगरपालिका अशा सर्वच संस्थावर राष्टÑवादीचा झेंडा आहे. येथून सामान्यांची कामे न झाल्याने मतदारांनी आपली चीड मतदान यंत्रातून दाखवून दिली. मतदारांच्या या ‘जोर का झटका, धीरेसे लगे’ ने आतातरी राकॉँ पदाधिकार्यांच्या गाडीच्या काचा खाली येतील का? सामान्यांच्या दु:ख पाहतील का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. नाहीतर आता पुन्हा घोडा मैदान समोरच आहे. मग ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था होऊ नये म्हणजे झाले.