गुंजोटीतील पुतळा प्रशासनाने हटविला
By Admin | Updated: January 15, 2017 01:07 IST2017-01-15T01:06:40+5:302017-01-15T01:07:14+5:30
उमरगा/गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री विना परवाना बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा शनिवारी सायंकाळी पोलीस, महसूल प्रशासनाने हटविला़

गुंजोटीतील पुतळा प्रशासनाने हटविला
उमरगा/गुंजोटी : उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री विना परवाना बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा शनिवारी सायंकाळी पोलीस, महसूल प्रशासनाने हटविला़ या प्रकारामुळे गुंजोटीत काही काळ तणाव निर्माण झाला होता़ प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले असले तरी रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता कायम होती़ दरम्यान, याच्या निषेधार्थ उमरगा शहरातील चौकात रास्ता रोको करण्यात आला़
गुंजोटी येथील शिवाजी चौकात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी विना परवाना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला होता़ शनिवारी सकाळी ही माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर फौजफाट्यासह महसूल प्रशासन गावात दाखल झाले़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी गुंजोटी ग्रामपंचायतीत बैठक झाली़ या बैठकीसाठी तहसीलदार अरविंद बोळंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी खांडवी, पोलीस उपनिरीक्षक बी.बी.वडदे, उपनिरीक्षक डी. व्ही. सिद्दे, विलास गोबाडे, विस्ताराधिकारी पी. एफ. चव्हाण, पोलीस पाटील नाजेर देशमुख आदी उपस्थित होते. शिवसेनेचे किरण गायकवाड, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, भाजप हर्षवर्धन चालुक्य, एम. ए. सुलतान, सरपंच शंकरराव पाटील, उपसरपंच शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक संजय पवार, उमाकांत माने आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली.
यादरम्यान गावात काही काळ तणावपूर्ण शांतता होती. दुपारी ३ ते ३.३० पर्यंत पोलीस बंदोबस्त असला तरी प्रशासनाने कार्यवाहीसंदर्भात कोणताच थांगपत्ता लागू दिला नाही़ मकरसंक्रांतीचा सण असल्याने दिवसभर कारवाई करण्यात आली नाही़ सायंकाळच्या सुमारास अचानक दंगल नियंत्रण पथकासोबत उपविभागीय जिल्हाधिकारी निलेश श्रींगी, पोलीस उपविभागीय अधिकारी खांडवीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह गावात दाखल झाले. प्रशासनाने पंचांसमक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढून ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ठेवण्यात आला़
दरम्यान, घटनेनंतर गुंजोटी गावात शांतता रहावी, यासाठी विश्वनाथ देशमुख, दिलीप शहा, राजेंद्र गायकवाड, मोहोद्दीन काझी, अयुब मुजावर, अमर नाईकवाडे, सुधीर हिरवे, बसवराज टोंपे, किसन पाटील आदी ग्रामस्थांनी प्रशासनासोबत प्रयत्न केले़ (वार्ताहर)