अपहृत चिमुकलीची खंडणीसाठी हत्या
By Admin | Updated: May 20, 2014 01:08 IST2014-05-20T01:05:08+5:302014-05-20T01:08:20+5:30
फकिरा देशमुख/बाळू मोकासर, भोकरदन, वालसावंगी (जि.जालना) दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली.
अपहृत चिमुकलीची खंडणीसाठी हत्या
फकिरा देशमुख/बाळू मोकासर, भोकरदन, वालसावंगी (जि.जालना) दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या सहा महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे सोमवारी घडली. तिच्यासोबतच गावातील अन्य ८ वर्षाच्या एका मुलीचेही अपहरण केले असून तिचा ठावठिकाणा अद्याप लागला नाही. वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांची मुलगी पायल (६ महिने) हिला १९ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास शेजारील लक्ष्मी गणेश सोनूने ( ८ वर्ष) ही मुलगी बाहेर खेळायला घेऊन गेली. त्याचवेळी अज्ञात आरोपींनी या दोघींचे अपहरण केले. ‘दीड लाख द्या अन्यथा मुलीला मारून टाकू’ भोकरदन, वालसावंगी पायलची शोधाशोध सुरू असतानांच वाघमारे यांच्या पत्नी रेश्मा वाघमारे यांच्या मोबाईलवर शेवाळे नामक एका महिलेचा फोन आला. ‘माझ्या मुलाच्या डोळ्याचे आॅपरेशन झाले आहे, त्यासाठी पैशांची गरज आहे. तुमची मुलगी माझ्या ताब्यात आहे. मुलगी पाहिजे असेल तर दीड लाख रूपये द्यावे लागतील. नसता तुमच्या मुलीला मारून टाकू’ अशी धमकी दिली. या धमकीने रेश्मा वाघमारे अधिकच घाबरल्या. रडारड सुरू झाली. आक्रोश ऐकून परिसरात सुरू असलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमातील महिला व पुरूष शासकीय निवासस्थानाकडे धावले. सर्वांनी मुलीचा शोध सुरू केला असता, त्यांच्या निवास्थानापासून १५० फूट अंतरावर ग्रामपंचायत सदस्य विजय भगवान गवळी यांच्या घराच्या मागील बाथरूममध्ये पायलचा मृतदेह आढळून आला. मात्र लक्ष्मी गणेश सोनूने ही मुलगी बेपत्ता होती. डॉ. वाघमारे यांना दोन मुली व एक मुलगा असून खून झालेली ही चिमुकली सर्वात धाकटी होती़ सदर घटनेची माहिती पारध पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्ांकर पटवारी यांनी पचंनामा करून चिमुकल्या मुलीचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविला. पारध पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूध्द खंडणीसाठी अपहरण करून खून करणे या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, पोलिस कर्मचारी एम़ बी़ भागवत, डी़ बी़ काकडे, प्रशांत उबाळे, उमेश टेकाळे यांनी वालसावंगी येथील सर्व घरांची तपासणी सुरू केली असुन दुसरी मुलगी एखाद्या घरात लपवून ठेवली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़ चौकट... चोरीस गेलेला मोबाईल आरोपी महिलेकडे सदर आरोपी महिलेने जो मोबाईल वापरला, तो विजय गवळी यांचा असून एक महिन्यापूर्वी तो हरवला होता. मात्र याबाबतची त्यांनी तक्रार दिलेली नाही. याबाबत पोलिस तपास करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपहृत मुलीचा शोध सुरू या घटनेतील अपहृत मुलगी लक्ष्मी गणेश सोनूने हिचे कुटुंबिय चिंतीत असून तिचा शोध सुरू आहे. मोबाईलवरून धमकी देणारी महिला मराठी भाषेतून बोलत होती. या महिलेने स्वत:हून आपले आडनाव शेवाळे असल्याचे सांगितले. मात्र, या घटनेत आणखी काही आरोपी असण्याचा पोलिसांना संशय आहे.