पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम
By Admin | Updated: July 1, 2014 01:06 IST2014-07-01T00:48:07+5:302014-07-01T01:06:42+5:30
जालना : नगरपालिकेच्या प्रभागनिहाय विशेष स्वच्छता मोहिमेस सोमवारी नवीन जालना येथील सिंधीबाजार परिसरातून प्रारंभ झाला.

पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम
जालना : नगरपालिकेच्या प्रभागनिहाय विशेष स्वच्छता मोहिमेस सोमवारी नवीन जालना येथील सिंधीबाजार परिसरातून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी स्वत: एक ते दीड कि़मी. पायी फिरून या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधल्या गेले होते.
पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी नायक यांनी नगरपालिकेत सात तास बैठका घेऊन काही नवीन संकल्पना साकारण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली होती. त्यादृष्टीने दररोजची साफसफाई मोहीम वगळता प्रत्येक आठवड्यात एकाच प्रभागात सर्व सफाई कामगारांमार्फत स्वच्छता करून संपूर्ण प्रभाग स्वच्छ करण्याचे जिल्हाधिकारी नायक यांनी सुचविले होते. त्यानुसार या मोहिमेची सोमवारी अंमलबजावणी करण्यात आली.
सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी नायक, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सिंधी बाजारमार्गे दे. राजा रोड, कडबी मंडी, सिंधी पंचायत, नाथबाबा गल्ली, अकेली बस्ती, जुना खवा मार्केट परिसर, महात्मा फुले भाजीमार्केट या भागात जाऊन तेथील अस्वच्छता, तुंबलेल्या नाल्या तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांची पाहणी केली. रस्त्यावर काही ठिकाणी बांधकाम साहित्या पडलेले जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. विनापरवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवून रहदारीला अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी स्वत: शहरात फिरून पाहणी केल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. त्यामुळे नागरिकही उत्सुकतेपोटी हा प्रकार पाहत होते.
यावेळी सफाई कामगारांनी या भागातील स्वच्छता केल्याचे नगरपालिकेतील सूत्रांनी सांगितले. ही मोहीम प्रत्येक आठवड्यात राबविण्यात येणार आहे.
मोहिमेस भेट देणार
नगरपालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमांना आपण स्वत: भेट देऊन पाहणी करू, असे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चांगल्या उपक्रमांना नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी केले.