मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2016 01:11 IST2016-10-19T00:59:10+5:302016-10-19T01:11:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी जोरात साजरी करता येणार आहे. दिवाळीनिमित्त बोनस नसला तरी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान,

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जोरात
औरंगाबाद : महापालिकेतील सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी जोरात साजरी करता येणार आहे. दिवाळीनिमित्त बोनस नसला तरी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, फेस्टिव्हल अॅडव्हान्स देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. दिवाळीपूर्वी देण्यात येणाऱ्या या रकमेमुळे मनपाच्या तिजोरीवर तब्बल सव्वा कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
मनपा प्रशासन सध्या आर्थिक संकटातून जात आहे. कर्जाचा डोंगर असताना समांतर जलवाहिनी, एलईडी दिव्यांचे कंत्राट, कंत्राटदारांची जुनी थकबाकी आदी मुद्यांवर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. राज्य शासनाकडून दरमहिन्याला एलबीटीचा मोबदला म्हणून १२ ते १५ कोटी रुपये भेटत आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचा पगार होत आहे. विकासकामे आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी तिजोरीत जेमतेम पैसे येत आहेत.
दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना चार पैसे मिळावेत या दृष्टीने प्रशासनाने दात कोरून सानुग्रह अनुदान, फेस्टिव्हल अॅडव्हान्स आदी पैसे देण्याची तयारी सुरू केली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या हातात कशी पडेल या दृष्टीने आर्थिक जुळवाजुळव करण्यात येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला १० हजार रुपये अॅडव्हान्स घेता येईल. ६०० कर्मचारी याचा लाभ घेतील. त्यामुळे मनपाला ६० लाख रुपये लागणार आहेत. २४७० रुपये सानुग्रह अनुदान द्यावे लागेल. २२०० कर्मचारी यासाठी पात्र आहेत. ही रक्कम ५५ लाखांपेक्षा अधिक आहे. दैनिक वेतनावर काम करणाऱ्यांना २ हजार रुपये दिवाळी भेट द्यावी लागेल. या कर्मचाऱ्यांची संख्या ४५० आहे. बचत गटाचे २८० कामगारांनाही दोन हजार रुपये दिवाळी भेट द्यावी लागणार आहे. १० लाख रुपये यावर खर्च येईल.
मनपातील कामगार शक्ती संघटनेने आयुक्तांना सोमवारी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. मनपा कामगारांना दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अग्रिम म्हणून १० हजार रुपये द्यावेत, सिडको-हडकोतील सफाई कामगारांना ८.३३ टक्के बोनस द्यावा, दैनिक वेतनावर काम करणाऱ्यांना मनपात कायमस्वरूपी म्हणून सामावून घ्यावे, दैनिक वेतन कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, आस्थापनेवरील रिक्त जागा त्वरित भराव्यात.
४कामगारांसाठी दहा लाखांचा रिस्क विमा काढावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
४निवेदनावर गौतम खरात, संजय रगडे, अशोक हिवराळे, कैलास जाधव, संतोष खरात, कचरू खरात, भास्कर आढाव, भाऊसाहेब पठारे, दामोदर दाभाडे, उत्तम दाभाडे, शाम शिरसाठ आदींच्या सह्या आहेत.