मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला; छत्रपती संभाजीनगरात चार लाख मतदारांची वाढ
By मुजीब देवणीकर | Updated: December 16, 2025 17:27 IST2025-12-16T17:10:11+5:302025-12-16T17:27:11+5:30
मागील निवडणुकीत ११३ नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती. आता ११५ नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक होईल.

मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला; छत्रपती संभाजीनगरात चार लाख मतदारांची वाढ
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, शहरात १५ जानेवारी रोजी मतदान होईल. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘कर’ असताना राज्य निवडणूक आयोग मतदान घेणार आहे. मागील पाच वर्षांपासून महापालिकेसाठी निवडणूक झाली नाही. दरम्यान मतदारांची संख्या ३ लाख ९८ हजारांनी वाढली आहे.
शेवटची मनपा निवडणूक २०१५ मध्ये घेण्यात आली होती. या निवडणुकीत ७ लाख १९ हजार ४३ मतदार होते. २०२५ मध्ये मतदारसंख्या ११ लाख १८ हजार झाली. मागील निवडणुकीत ११३ नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती. सातारा-देवळाईचा मनपा हद्दीत समावेश झाल्यानंतर दोन वॉर्ड करून स्वतंत्र निवडणूक घेण्यात आली होती. आता ११५ नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक होईल. मागील निवडणुकीत ९५२ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. यंदा इच्छुकांची संख्या वाढणार हे निश्चित.
शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे महापालिका होय. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना येथील राजकारणात बराच रस असतो. त्यामुळे महापालिका निवडणूक लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असते. दोन ते तीन वेळेस नगरसेवक झालेल्या अनेक राजकीय मंडळींना नंतर आमदार, खासदार होण्याचीही संधी मिळाली. त्यामुळे राजकारणातील वाटचालीची ही पहिली पायरी असल्याचेही म्हटले जाते. महापालिकेचा कार्यकाल एप्रिल २०२० मध्ये संपला. त्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत. मागील पाच वर्षांपासून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीची वाट पाहत होते. ती प्रतीक्षा अखेर संपली. सोमवारी निवडणूक कार्यक्रमही घोषित झाला.
११३ पैकी दोन ठिकाणी झाली होती बिनविरोध निवड
मागील आणि आताच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे २०१५ ची निवडणूक वॉर्ड पद्धतीने झाली होती. आता प्रभाग पद्धतीने होत आहे. प्रभागसुद्धा चार सदस्यांचे आहेत. एवढ्या मोठ्या प्रभागात निवडणूक लढण्याची सवय कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे सर्वच इच्छुकांची दमछाक होत आहे. २०१५ मध्ये ११३ पैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे १११ जागांवर निवडणूक झाली होती. २२ एप्रिल २०१५ रोजी मतदान झाले होते. आता १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मागील निवडणुकीत ४ हजार ५०० कर्मचारी निवडणुकीला लागले होते. आता ती संख्या वाढून ६ हजार झाली. २०१५ च्या निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. २०१० मध्ये ५८ टक्के मतदान झाले होते.
१३९८ मतदान केंद्रे
मतदान केंद्र प्रत्येक प्रभागातच राहतील, याची काळजी घेतली जाईल. त्यानुसार १३९८ मतदान केंद्र राहतील. प्रत्येक मतदान केंद्रावर २०० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.मतदान केंद्रावर सोयीसुविधा देण्यासाठी विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. एकूण ५६०० कर्मचारी लागणार असून, १० टक्के जास्त याप्रमाणे ६१०० कर्मचाऱ्यांची सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन ठिकाणी होणार मतमोजणी
नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी जालना रोडवरील एसएफएस शाळा, उस्मानपुरा येथील शासकीय तंत्रशिक्षण विद्यालय (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज), रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज) या ठिकाणी होणार आहे.