एलबीटी भरणार्यांनाही महानगरपालिकेच्या नोटिसा
By Admin | Updated: May 29, 2014 00:33 IST2014-05-29T00:12:28+5:302014-05-29T00:33:44+5:30
लातूर : नियमितपणे एलबीटी भरणार्या व्यापारी, संस्थांना महानगरपालिकेने नोटिसा पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आणला आहे़

एलबीटी भरणार्यांनाही महानगरपालिकेच्या नोटिसा
लातूर : नियमितपणे एलबीटी भरणार्या व्यापारी, संस्थांना महानगरपालिकेने नोटिसा पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आणला आहे़ दरम्यान, नियमानुसारच नोटिसा पाठविल्याचे सांगून काहिंना नजरचुकीने त्या गेल्याचे स्पष्टीकरण बुधवारी मनपाने दिले़ व्यापार्यांचा विरोध असला तरी शासन निर्देशाचे पालन करीत लातूर महानगरपालिकेकडून एलबीटी वसुलीचे काम सुरु आहे़ परंतु, व्यापार्यांचा प्रतिसाद नसल्याने हे काम मरगळलेल्या अवस्थेतच सुरु आहे़ एलबीटी न भरणार्या व्यापार्यांसोबतच नियमितपणे भरणार्या व्यापारी, संस्थांनाही मनपानेही एलबीटी भरण्याबाबत नोटिसा काढल्या़ एलबीटी विभागाच्या या अजब कारभारामुळे प्रामाणिक व्यापारी, संस्था चक्रावून गेले़ मंगळवारी या सर्वांनाच समक्ष भेटण्याची सूचना करण्यात आली होती़ त्यासही फारसा प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु, नियमित एलबीटी भरणार्या काही व्यापारी, संस्थांनी मनपात धाव घेऊन एलबीटी विभागात अधिकार्यांची भेट घेतली़ तेव्हा त्यांनी दाखविलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन परत पाठविण्यात आले़ या प्रकारामुळे हकनाक वेळ वाया गेला़ एलबीटी न भरणार्या व्यापारी, संस्थांची स्वतंत्र यादी तयार करुन त्यांनाच नोटिसा पाठविण्याऐवजी सरसकट सर्वांनाच नोटिसा पाठवून आपल्या अजब कारभाराचा नमुना पेश केला़ (प्रतिनिधी)