महापालिका दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:31+5:302020-12-17T04:29:31+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५२ कोटींचे पॅकेज दिले आहे. या निधीत महापालिकेच्या वाट्याला नऊ रस्ते ...

Municipal Corporation will start road works in ten days | महापालिका दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू करणार

महापालिका दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू करणार

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५२ कोटींचे पॅकेज दिले आहे. या निधीत महापालिकेच्या वाट्याला नऊ रस्ते आले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाले. पुढील आठ ते दहा दिवसांत रस्त्यांची कामे सुरू होतील, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले.

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसी प्रत्येकी ७ तर महापालिका ९ रस्ते विकसित करणार आहे. महापालिका वगळता इतर रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागील आठवड्यात शासनाने पत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी १५२ कोटींच्या निधीतील रस्तेकामाच्या भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

महापालिकेच्या हिश्श्यातील रस्त्यांच्या कामाबाबत कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी सांगितले की, येत्या दहा दिवसांत कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कामे सुरू होतील. सध्या हॉटेल अमरप्रित ते एकता चौक या रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. दहा दिवसांनंतर संपूर्ण कामे सुरू होतील. १०० कोटींतील रस्त्यांच्या कामांची पाहणी करणारे अधिकारीच यावर देखरेख करणार आहेत.

महापालिका करणार या रस्त्यांची कामे

१) वोखार्ड ते जयभवानी चौक, नारेगाव व रेल्वेस्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह रस्त्याचे डांबरीकरण.

२) दीपाली हॉटेल ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे डांबरीकरण.

३) पुंडलिकनगर ते एन-३, एन-४ मधील हायकोर्ट ते कामगार चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण.

४) भवानी पेट्रोलपंप ते ठाकरेनगर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण.

५) महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण.

६) अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साइज ऑफीस रस्त्याचे काँक्रिटीकरण.

७) जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रिटीकरण.

८) जळगाव रोड ते अजंटा अँबेसेडर रस्त्याचे डांबरीकरण

९) अमरप्रित हॉटेल ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण.

Web Title: Municipal Corporation will start road works in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.