औरंगाबादमध्ये मुंडेंचा नित्य संपर्क

By Admin | Updated: June 4, 2014 01:35 IST2014-06-04T01:24:13+5:302014-06-04T01:35:19+5:30

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते.

Mundane's regular contact in Aurangabad | औरंगाबादमध्ये मुंडेंचा नित्य संपर्क

औरंगाबादमध्ये मुंडेंचा नित्य संपर्क

औरंगाबाद : केंद्रीय ग्रामविकासमंत्री खा. गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याची राजधानी औरंगाबादवर विशेष प्रेम होते. १९७२ साली ते समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. दुष्काळाच्या काळात मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत त्यांनी आंदोलन केले. तेव्हापासूनच त्यांची या शहराची नाळ जुळत गेली. भाजपाला औरंगाबादेत मोठे करण्यासाठी त्यांनी अनेक कटू निर्णय घेतले. १९८४ साली मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुणे मतदारसंघातून वेगळा झाल्यानंतर प्रचारासाठी त्यांनी मराठवाडा पिंजून काढला. मुंडे समर्थनगर येथील कार्यालयात जीपने पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. तेथूनच त्यांच्यातील खरा लढवय्या नेता औरंगाबादकरांना कळाला. त्यानंतर १९८८ सालची मनपाची निवडणूक, १९८९-९१ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी औरंगाबादेतील कार्यकर्त्यांची मोट बांधली. १९९३ साली त्यांनी संघर्षयात्रेचे नेतृत्व केले. त्या काळात शहरातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या विचारांशी जोडले गेले. १९९५ नंतर त्यांचे औरंगाबादेतील वास्तव्य आणखी वाढले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे युती सरकारच्या काळात होती. या काळातच माजी आ. श्रीकांत जोशी, माजी आ. हरिभाऊ बागडे, उद्योजक विवेकदेशपांडे, डॉ. भागवत कराड यांच्यासोबत त्यांच्या अनेक राजकीय मसलती होऊ लागल्या. रामा हॉटेलमध्येदेखील ते अनेकदा मुक्कामी असायचे. २००० साली झालेल्या मनपा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेसोबत युती करण्याऐवजी भाजपाला स्वतंत्र मैदानात आणले. १९८८ साली झालेल्या सेना-भाजपाच्या युतीच्या विरोधात प्रथमच मुंडेंनी थेट आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानामुळे भाजपा एकसंघ लढली, मनपात भाजपाचे प्राबल्य वाढले. २००६ साली प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर भाजपा आणि सेनेत जेव्हा-जेव्हा वाद झाले, ते वाद सोडविण्यासाठी मुंडे यांची मध्यस्थी महत्त्वाची असायची. २००७ साली डॉ. कराड यांना महापौरपदासाठी दुसर्‍यांदा संधी फक्त आणि फक्त खा. मुंडे यांच्यामुळेच मिळाली. पक्षातून विरोध असतानाही मुंडेंमुळे ते शक्य झाले होते. २०१० साली भाजपाने शिवसेनेकडून स्थायी समिती सभापतीपद हिसकावले. त्यावरून युती तुटण्यापर्यंत वातावरण निर्माण झाले होते. भाजपा शहराध्यक्षाला मारहाण आणि कार्यालयावर दगडफेक करण्यापर्यंत सेनेने वचपा काढला. तेव्हाही खा. मुंडे यांनी उद्योजक देशपांडे यांच्या घरी बैठक घेऊन तो वाद मिटविला होता. औरंगाबादचे राजकारण आणि समाजकारणात त्यांनी भाजपाला एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळवून दिला होता.

Web Title: Mundane's regular contact in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.