मुंबई, नागपूर एशियाड बस बंद
By Admin | Updated: August 6, 2015 01:02 IST2015-08-06T00:29:24+5:302015-08-06T01:02:50+5:30
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने मध्यवर्ती बसस्थानकातून सुरू असलेली मुंबई आणि नागपूर मार्गावरील एशियाड बससेवा अचानक बंद केली आहे.

मुंबई, नागपूर एशियाड बस बंद
औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने मध्यवर्ती बसस्थानकातून सुरू असलेली मुंबई आणि नागपूर मार्गावरील एशियाड बससेवा अचानक बंद केली आहे. या मार्गावरील अन्य विभागांच्या बसेस प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे औरंगाबादहून मुंबई आणि नागपूरला जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद - नागपूर आणि रात्री ८.१५ वाजता औरंगाबाद- मुंबई एशियाड बससेवा सुरू होती. शिवाय एस. टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्याच बसेसद्वारे मुंबई- औरंगाबाद आणि नागपूर-औरंगाबाद एशियाड बससेवा चालविण्यात येत होती; परंतु १८ जुलैपासून या चारही बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना होणाऱ्या पुणे- नागपूर, यवतमाळ-मुंबई, परभणी- मुंबई अशा अन्य विभागांच्या बसेसचा आधार घेण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. परंतु या बसेस गर्दीने भरलेल्या असतात. त्यामुळे प्रवाशांना खाजगी बससेवेचा रस्ता धरावा लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिक, अकोल्यापर्यंतच बसगाड्या धावत आहेत.
रेल्वेचा आधार आरक्षण करणाऱ्यांना औरंगाबादहून नाशिक आणि नागपूरला जाण्यासाठी प्रवाशांना रेल्वेगाड्यांचा मोठा आधार मिळतो. परंतु अनेकदा ऐनवेळी प्रवास करण्याची वेळ येते. अशा वेळी आरक्षणाअभावी रेल्वे प्रवास करणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे एस. टी. बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. परंतु या ठिकाणीही त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.