रेल्वे मालधक्क्यावर मल्टीफंक्शनल शेड
By Admin | Updated: June 30, 2014 01:04 IST2014-06-30T00:44:46+5:302014-06-30T01:04:22+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर माल वाहतुकीतून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते.

रेल्वे मालधक्क्यावर मल्टीफंक्शनल शेड
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील मालधक्क्यावर माल वाहतुकीतून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते, असे असतानासुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून मालधक्क्यावरील गोदामाची क्षमता वाढविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले; परंतु आता या ठिकाणी मल्टीफंक्शनल स्टोअर गुडस् शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात ऊन असो की पाऊस ट्रकमध्ये माल भरण्याबरोबर मालाचे नुकसान टाळण्यासाठी मल्टीफंक्शनल शेड उपयोगी ठरणार आहे.
मालधक्क्यावर रात्री-बेरात्री येणारा माल उतरवून घेण्याची जबाबदारी कंत्राटदारावर येते. त्यातही मालधक्क्यावर एकाच वेळी दोन गाड्या आल्यानंतर माल उतरविण्यास अधिक वेळ लागतो. आलेला माल निर्धारित वेळेत उतरविला नाही, तर कंत्राटदारांना डॅम्रेज भरावे लागते. एकीकडे अशी परिस्थिती, तर गोदामाची क्षमता कमी असल्याने पावसाळ्यात माल कुठे उतरवून घ्यायचा ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. माल उघड्यावर ठेवून नंतर त्याची उचल करावी लागत आहे. यातून माल पावसात भिजल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पावसाळ्यात सुरक्षितरीत्या माल उतरविण्यासाठी आणि ठेवण्यासाठी शेडची सोय करून देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. रेल्वेच्या वतीने नुकतेच मालधक्क्यावर शेडचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात ट्रकमध्ये माल भरण्यासाठी आणि वेळप्रसंगी माल ठेवण्यासाठी शेडचा वापर करता येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन महिन्यांत काम पूर्ण
मल्टीफंक्शनल स्टोअर गुडस् शेड उभारण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ट्रकमध्ये माल भरण्याबरोबर माल ठेवण्यासाठीही त्याचा वापर करता येईल. आगामी तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे सहायक मंडल अभियंता डी. चंद्रमोहन यांनी सांगितले.
शेडचा मिळणार आधार
उभारण्यात येणाऱ्या शेडमुळे ऊन आणि पावसात माल उतरविताना होणारी दमछाक काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. पावसात माल भिजण्यापासून वाचण्यासही हातभार लागेल; परंतु मल्टीफंक्शनल शेडचे काम पूर्ण होण्यास जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळाही मालधक्क्यावरील लोकांसाठी मालाच्या सुरक्षितेसाठी धावपळ करणारा राहणार असल्याचे दिसते.
ट्रक लावण्यासाठी अडचण
मालधक्क्यावर मालगाडी उभी करण्यासाठी जी-१ आणि जी-२, असे दोन रेल्वे ट्रॅक आहेत. यामध्ये जी-१ ट्रॅकवर आलेल्या मालगाडीतून माल उतरविण्यासाठी आणि उतरविल्यानंतर ट्रकचालकांची मोठी अडचण होत आहे. येथील जागा अपुरी पडत असून या ठिकाणी असलेल्या पिटलाईनमुळे अधिक अडचण होत आहे. त्यामुळे एक ट्रक गेल्याशिवाय दुसरा ट्रक निघू शकत नसल्याने आर्थिक नुकसानाबरोबर वेळेचा अपव्ययही होत असल्याचे कंत्राटदारांकडून सांगितले जाते. जी-२ या ठिकाणी ट्रक उभे करण्यासाठी पुरेशी जागा आहे; परंतु येथील खड्डेमय रस्त्याचा त्रास ट्रकचालकांना सहन करावा लागत आहे.
पिटलाईन हटवावी
शेडचा प्रश्न मार्गी लागला आहे; परंतु जी-१ येथे माल उतरविल्यानंतर ट्रक हलविण्यासाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जागा वाढविण्यासाठी येथील पिटलाईन हटविण्याची आवश्यकता आहे, असे हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टेशन अँड हुंडेकरी असोसिएशनचे अध्यक्ष मोहंमद असलम यांनी म्हटले.