MPSC Exam: काहींना चालू घडामोडी, तर अनेकांना गणित, बुद्धीमत्तेच्या प्रश्नांनी फोडला घाम
By योगेश पायघन | Updated: October 8, 2022 19:07 IST2022-10-08T19:06:33+5:302022-10-08T19:07:10+5:30
एमपीएससी परीक्षा: १८ हजार ९०४ उमेदवारांनी दिली गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, ४ हजार ३६९ विद्यार्थी गैरहजर

MPSC Exam: काहींना चालू घडामोडी, तर अनेकांना गणित, बुद्धीमत्तेच्या प्रश्नांनी फोडला घाम
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी शहरात ६९ केंद्रावर गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ पार पडली. २३ हजार २७३ पैकी १८ हजार ९०४ (८१.२३टक्के) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ४,३६९ विद्यार्थी गैरहजर होते. यात अनेकांना चालू घडामोडी, इतिहासाचे प्रश्न अवघड वाटले तर काहींना गणित, बुद्धीमत्तेच्या प्रश्नांनी घाम फोडल्याचे परीक्षार्थी म्हणाले.
सकाळी ११ ते १२ या दरम्यान १०० गुणांचा पेपर होता. त्यासाठी सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यंत उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. संयुक्त पुर्वपरीक्षेत इतिहास, भूगोल, राजशास्त्र, अर्थशात्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय सामान्य अध्ययन या १०० गुणांच्या वस्तूनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठी होती. सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक,मुद्रांक निरीक्षक या संवर्गातील विविध ८०० पद भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली. २८०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी काम पाहीले.
विद्यार्थी म्हणतात :
६० मिनीटात १०० प्रश्न
सोपा ते मध्यमस्वरूपाचा पेपर होता. १०० प्रश्नांसाठी ६० मिनीटांचा वेळ कमीच पडला. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न अधिक आणि वेळखाऊ होते.
-आकाश सवडे, परीक्षार्थी
बुद्धीमत्तेचे प्रश्न कमी होते. तर गणिताचे प्रश्न अधिक व वेळखावू होते. अर्थशास्त्राचे प्रश्न काहीसे अवघड होते. मात्र, पेपर चांगला सोडवला.
-शुभम बेडवाल, परीक्षार्थी
परीक्षेतील सात विषयांपैकी चालू घडामोडीवरील प्रश्न अवघड होते. इतर प्रश्न सोपे होते. १०० प्रश्नांना वेळ कमी पडला.
-सरीता खंदारे, परीक्षार्थी ---
माझा पहिलाच प्रयत्न होता. गणित विज्ञानावरील प्रश्न अवघड गेले तर भूगोल, इतिहासाचे प्रश्न सोपे वाटले.
-सायली पठाडे, परीक्षार्थी