एसबीओ शाळेत तात्पुरते जेल उभारण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:06 IST2021-04-30T04:06:02+5:302021-04-30T04:06:02+5:30
औरंगाबाद : कोरोना संसर्ग जेलमध्ये पसरू नये याकरिता नव्याने जेलमध्ये दाखल तयार केले जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ...

एसबीओ शाळेत तात्पुरते जेल उभारण्याच्या हालचाली
औरंगाबाद : कोरोना संसर्ग जेलमध्ये पसरू नये याकरिता नव्याने जेलमध्ये दाखल तयार केले जाणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी जेलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एसबीओ शाळेची पाहणी केली.
कोरोना महामारी दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. गतवर्षीच्या तुलनेत मृत्युदर वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर हर्सुल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता जेल प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जेलमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या न्यायाधीन बंद्याला जेलमधील स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येते. तेथे तो १४ दिवस राहिल्यावर आतल्या सर्कल बराकीत पुन्हा १४ दिवस स्वतंत्र ठेवण्यात येते. अन्य कैद्यांचा त्याच्याशी संपर्क येऊ दिला जात नाही. असे असले तरी बाहेरील कैदी जेलमध्ये गेल्यावर इतरांना संसर्ग होणार नाही याची हमी कोणीही देऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन जळगाव रोडवरील एसबीओ शाळेत तात्पुरते जेल उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी यांनी जेलचे उपअधीक्षक आर. आर. भोसले, तुरुंगाधिकारी तायडे आणि एस. पी. घाटे या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आज एसबीओ शाळेच्या इमारतीची पाहणी केली. तेथे कैदी ठेवता येतील का? कैद्यांच्या सुरक्षितता आणि ते पळून जाणार नाही, अशी कडक व्यवस्था तेथे करता येईल का? याविषयी चाचपणी करण्यात आली. गतवर्षीही तेथे काही दिवस तात्पुरते कारागृह निर्माण करण्यात आले होते. तेव्हा तेथून एका कैद्याने पलायन केले होते. नंतर या कैद्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. मात्र, या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, अशी खबरदारी यावेळी घ्यावी लागेल.
=========
चौकट
कोरोना संसर्ग कारागृहात पसरू नये, याकरिता एसबीओ शाळेत तात्पुरते जेल स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी एसबीओ शाळेची पाहणी केली. मात्र, अद्याप याविषयी निर्णय झाला नाही.
= आर. आर. भोसले, जेल उपअधीक्षक.