अतिक्रमण हटाव मोहिमेला गती
By Admin | Updated: January 7, 2015 01:00 IST2015-01-07T00:54:01+5:302015-01-07T01:00:52+5:30
लातूर : शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मनपा प्रशासनाने हाती घेतली आहे़ मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात मंगळवारी महापौर, सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत

अतिक्रमण हटाव मोहिमेला गती
लातूर : शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मनपा प्रशासनाने हाती घेतली आहे़ मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात मंगळवारी महापौर, सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील शिवाजी चौक ते अशोक हॉटेलच्या डाव्या साईडच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले़ रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरु होती़
मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी सकाळी १० वाजता सुरु करण्यात आली़ रात्री उशिरापर्यंत शिवाजी चौक ते अशोक हॉटेल पर्यंत अतिक्रमणे हटविण्यात आले़ यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती़ वाहनांची रांग लागली होती़ शहरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ याची दखल घेत मनपा प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलीे़ त्यांअंतर्गत प्रथम सिल्वर ज्युबली रोड, खोरी गल्लीतही मोहीम सुरू केली़ तेथील अतिक्रमण हटविल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर असलेल्या शिवनेरी गेटपासून जेसीबीच्या साह्याने कामकाज सुरू झाले़ हे सर्व अतिक्रमण हटविण्यात आले़ मंगळवारी शिवाजी चौकातील अतिक्रमण हटविले़ (प्रतिनिधी)४
अतिक्रमण मोहीम खोरी गल्लीमध्येच थांबणार का? शहरातील विविध भागात ही अतिक्रमण मोहीम राबवली जाणार का? अशा चर्चा होत असताना माहापलिकेच्या वतीने शहरात सर्वत्र अतिक्रमण मोहीम राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते़ ब्रिज हॉटेलच्या कॉर्नरपासून सकाळी चुन्याची फक्की मारुन आपापली अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आली होती़ त्यानुसार कांही जणांनी अतिक्रमणे काढून घेतली़
उर्वरीत अतिक्रमणे ३ जेसीबीच्या साह्याने काढण्यात आली़ याच परिसरतील अॅड़ विक्रम हिप्परकर हे स्वत: अतिक्रमण काढून घेणार असल्याने येथील कार्यवाही तात्पुरती थांबवली़ त्याच परिसरातील एका मालकने कोर्टाचे स्टे आॅर्डर दाखवील्याने यांनाही तात्पुरता दिलासा मिळाला.
४यावेळी महापौर अख्तर शेख, मनपा सहाय्यक आयुक्त डॉ़ प्रदिप ठेंगळ, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, अतिक्रमण विभाग प्रमुख कलिम शेख, स्वच्छता निरीक्षक एस़ एस़ राऊत उपस्थित होते़ अतिक्रमण मोहिमेमुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती़ त्यामुळे शहर पोलिस वाहतूक शाखेला कसरत करावी लागली़