वेळेच्या मर्यादेतच सर्वाधिक आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:16 IST2018-11-07T23:14:57+5:302018-11-07T23:16:23+5:30

शहरवासीयांनी अखेरच्या दिवशी फटाके खरेदी केली. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत फटाका बाजारात गर्दी दिसून आली. न्यायालयाने दिलेले रात्री ८ ते १० वाजेचे बंधन पाळत याच वेळेत सर्वाधिक आतषबाजी करण्यात आली.

 The most fireworks in the time limit | वेळेच्या मर्यादेतच सर्वाधिक आतषबाजी

वेळेच्या मर्यादेतच सर्वाधिक आतषबाजी

ठळक मुद्देशहरवासीयांचे भान : लक्ष्मीपूजनापर्यंत फटाका बाजारात गर्दी

औरंगाबाद : शहरवासीयांनी अखेरच्या दिवशी फटाके खरेदी केली. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत फटाका बाजारात गर्दी दिसून आली. न्यायालयाने दिलेले रात्री ८ ते १० वाजेचे बंधन पाळत याच वेळेत सर्वाधिक आतषबाजी करण्यात आली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी साजरी करण्यात येत आहे. त्यात वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने फटाके उडविण्यास वेळेचे बंधन घालून दिले होते. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचेही आदेश देण्यात आले होते. याचा परिणाम, यंदा फटाक्यांच्या विक्रीवर होईल, असे सांगितले जात होते. मंगळवारपर्यंत फटाका बाजारात शुकशुकाट होता. शहरात ७ कोटींचे फटाके आले. त्यातील १० लाखांचे फटाकेच मंगळवारपर्यंत विक्री झाले होते. मात्र, शहरवासीयांनी बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके खरेदीसाठी एकच गर्दी केली. अयोध्यानगरीत रात्री ८ वाजेपर्यंत फटाके खरेदीसाठी गर्दी दिसून आली. काही विक्रेत्यांकडील ७० टक्के फटाके विक्री झाल्याची माहिती फटाके असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल कुलकर्णी यांनी दिली.
रात्री ८ वाजेपासून फटाके फोडण्याचे आदेश होते; पण शहरात काही जणांनी ७.३० वाजेपासून फटाके फोडण्यास सुरुवात केली होती. मात्र, अशांचे प्रमाण कमी होते. त्यातही लहान मुलेच फटाके वाजवताना दिसले. ८ वाजेनंतर मात्र, फटाक्यांचा धूमधडाका सुरू झाला. १० वाजेपर्यंत फटाके वाजत होते; पण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी फटाके फुटल्याच्या अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
चौकट
अनार, भुईचक्र, रॉकेटचा वापर अधिक
शहरात ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अनेकांनी खबरदारी घेतली. मोठ्या आवाजाचे बॉम्ब फोडण्यापेक्षा अनार, भुईचक्र, रॉकेटचा वापर अधिक दिसत होता. लवंगी फटाक्यांच्या लडीही फोडण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले.

Web Title:  The most fireworks in the time limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.