शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त

By Admin | Updated: June 23, 2014 00:32 IST2014-06-23T00:13:27+5:302014-06-23T00:32:16+5:30

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.

More than half of the vacancies of teachers of Government Dental College vacant | शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त

शासकीय दंत महाविद्यालयातील शिक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त

औरंगाबाद : शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्तपदाचा फटका तेथील विद्यार्थी प्रवेश क्षमता ४० वरून ५० अशी वाढविण्याच्या प्रस्तावाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
घाटी रुग्णालयात प्राध्यापकांची ९ पदे मंजूर असून त्यापैकी मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभाग, मुखशल्यचिकित्साशास्त्र विभाग, सामाजिक दंतशास्त्र, बालदंतशास्त्र विभाग आणि बालदंतव्यंगोपचारशास्त्र अशा पाच विभागांतील पदे रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांची २२ पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल १५ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
मुखरोगनिदान विभाग, दंतपरिवेष्ठनशास्त्र, दंतशल्यशास्त्र, बालदंतशास्त्र या विभागांतील प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत, तर कृत्रिम दंतशास्त्र विभागासाठी मंजूर चार पदांपैकी तीन पदे रिक्त आहेत, तर अन्य ४ विभागांतही प्रत्येकी एका शिक्षकाचे पद रिक्त आहे. अधिव्याख्यात्यांची ३० पदे मंजूर असून त्यापैकी २८ पदे भरलेली आहेत. यात १८ पदांवर बंधपत्रित उमेदवार कार्यरत आहेत.
भारतीय दंत परिषदेच्या पथकातर्फे २६ आणि २७ मे रोजी दंत महाविद्यालयाची तपासणी करण्यात आली. या पथकाने दंत परिषदेला सादर केलेल्या गोपनीय अहवालात येथील प्राध्यापक, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची त्रुटी काढली आहे. तसेच तेथील विविध विभागांत आवश्यक त्या उपकरणांचीही कमतरता असल्याचे नमूद केले आहे.
महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये ई-जर्नल उपलब्ध नसल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. काढण्यात आलेल्या त्रुटीची तातडीने पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्रही महाविद्यालयास पाठविण्यात आले होते. सर्व त्रुटींची पूर्तता होणे अशक्य असल्याने या वर्षीही प्रवेश क्षमता वाढण्याची आशा मावळली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: More than half of the vacancies of teachers of Government Dental College vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.