अर्ध्याहून अधिक झाडे जळाली
By Admin | Updated: June 9, 2017 00:04 IST2017-06-09T00:03:45+5:302017-06-09T00:04:56+5:30
परभणी : गतवर्षी पावसाळ्यात मोठा गाजावाजा करुन लावलेल्या झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडे जळाली

अर्ध्याहून अधिक झाडे जळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गतवर्षी पावसाळ्यात मोठा गाजावाजा करुन लावलेल्या झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडे जळाली असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मागील वर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाच्या प्रत्येक विभागाला झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, वृक्षारोपणासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती वृक्षारोपणासंदर्भात झाली आहे. परभणी शहरात मागील वर्षी लावलेली झाडे किती जगली, याचे गुरूवारी स्टिंग आॅपरेशन केले असता लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे जळाल्याचेच दिसून येत आहे.
मागील वर्षी १ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी या ठिकाणी झाडे लावली. त्यामुळे हा परिसर काही दिवसांनी हिरवागार दिसेल, अशी अपेक्षा होती. परंतु, झाडे तर वाढली नाहीत. त्या जागी गवत मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या परिसराची पाहणी केली असता हिरवागार होणारा हा परिसर उजाड झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी स्वत: लावलेले झाड देखील जळाले आहे. तसेच वन विभागाचे प्रमुख अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांनी लावलेली झाडे या ठिकाणी जळाल्याचे दिसून आले. मागील वर्षी वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ लोखंडी ट्री गार्ड वृक्षारोपणाची साक्ष देत आहेत. परंतु, या ट्री गार्डमध्ये झाडच नसल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे वृक्षारोपणाचे काम गाजावाजा करीत होत असले तरी संवर्धनाकडे मात्र पाठ फिरवली जात आहे. परिणामी वृक्षारोपण मोहीम म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरु लागली आहे. जुना पेडगावरोड भागातील झाडांची पाहणी केली असता अनेक झाडे बऱ्यापैकी वाढली असली तरी ८ ते १० झाडे वाळली आहेत. या ठिकाणी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावण्यात आले होते. परंतु, ट्री गार्डच चोरीला गेल्याचे या पाहणीत दिसून आले. अशीच परिस्थिती जेल कॉर्नर ते नानलपेठ रस्त्यावर पहावयास मिळाली. या रस्त्यावरील गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर ट्री गार्डसह झाडेही गायब झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमांवर होणारा खर्च केवळ उदासीनतेमुळे दरवर्षी वाया जात असून परभणी जिल्ह्याचे हरित स्वप्न स्वप्नच राहत आहे.