अधिकमासामुळे यावर्षी २० टक्के गणेशमूर्ती जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:49 IST2018-08-23T18:45:50+5:302018-08-23T18:49:46+5:30
अधिकमासामुळे गणेशोत्सव यंदा १८ दिवस उशिराने सुरू होत आहे.

अधिकमासामुळे यावर्षी २० टक्के गणेशमूर्ती जास्त
औरंगाबाद : अधिकमासामुळे गणेशोत्सव यंदा १८ दिवस उशिराने सुरू होत आहे. अधिकचे दिवस मिळाल्याने मूर्तिकारांनी २५ टक्के गणेशमूर्ती जास्त तयार केल्या आहेत. लहान-मोठ्या मिळून ३ लाख मूर्ती यंदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. शहरात प्रत्यक्षात मूर्ती तयार करणारे १५ मूर्तिकार आहेत, तर १०० पेक्षा अधिक कारागीर परिवार आहेत. यात औरंगपुरा, जवाहर कॉलनी, बालाजीनगर, अरिहंतनगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर रोड, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिडको-हडको, बेगमपुरा, पडेगाव रोड, वाळूज, पंढरपूर या भागात मूर्तिकार आहेत. सर्वत्र आता मूर्ती रंगविण्याचे काम सुरूआहे.
मोठ्या मूर्तींना पांढरा रंग लावण्यात आला असून, अजून रंगकाम हाती घेण्यात आले नाही. सुमारे हजार लोक या मूर्तिकलेवर उदरनिर्वाह करतात. शहरात दरवर्षी लहान-मोठ्या सुमारे अडीच लाख गणेशमूर्ती तयार होतात. यंदा अधिकमासामुळे मूर्तिकारांना १८ दिवस जास्तीचे मिळाले आहे. यामुळे मागील वर्षीपेक्षा ५० हजार मूर्ती जास्त तयार करण्यात आल्या आहेत. शहरात साडेतीन लाख मूर्र्तींची मागणी असते. बाकीच्या मूर्ती पेण, नगर,अमरावती, चिखली, बुलडाणा आदी भागांतून आणल्या जातात.
पेणहून शाडूमातीच्या मूर्तीही मोठ्या प्रमाणात शहरात येतात. मात्र, शहरातच यंदा जवळपास ५० हजार मूर्ती जास्तीच्या तयार झाल्या आहेत. यामुळे विक्रेते परजिल्ह्यातून मूर्ती आणण्याचे धाडस करीत नाहीत, येथूनच मूर्ती घेऊन विकण्याकडे विक्रेत्यांचा कल अधिक असल्याचे सध्या दिसून येत आहे, अशी माहिती ज्येष्ठ विक्रेते प्रकाश तांबे यांनीदिली.
जिल्हा परिषद मैदानावर काही मूर्तिकारांनी आपले तंबू ठोकले असून, तिथे मोठ्या मूर्ती बनविल्या जात आहे. मात्र, गुजरातचे चार कारागीर परिवार यंदा आले नाहीत. यामुळे येथे मोठ्या मूर्ती कमी राहतील, पोळ्यानंतर जि.प.मैदानात स्टॉलवर मूर्ती येतील,अशी माहिती ज्येष्ठ विक्रेते अशोक राठोड यांनी दिली.
मूर्तींच्या भावात १५ टक्क्यांनी वाढ
सरकारने गणेशमूर्तीवरील जीएसटी रद्द केला असला तरी प्रत्यक्षात मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर आॅफ पॅरिस, रंगांच्या किमती वाढल्याने १५ टक्के किमती वाढल्या आहेत. यासंदर्भात गणेश बगले या मूर्तिकाराने सांगितले की, शहरातील पिढीजात मूर्तिकार नवरात्रोत्सव झाल्यानंतर पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यास सुरुवात करीत असतो. डिसेंबर महिन्यातच सरकारने मूर्तीवरील जीएसटी रद्द केल्याची घोषणा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस, रंगावरील जीएसटी कमी होणे आवश्यक आहे. यामुळे किंमती वाढल्या आहेत.