मनी पेज/रिलायन्स
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:16+5:302020-12-04T04:12:16+5:30
नवी दिल्ली : आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी विक्रीस ठेवलेल्या ‘रिलायन्स कॅपिटल्स’च्या (आरकॅप) मालमत्ता खरेदी करण्यासाठी ६० कंपन्या पुढे आल्या ...

मनी पेज/रिलायन्स
नवी दिल्ली : आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी विक्रीस ठेवलेल्या ‘रिलायन्स कॅपिटल्स’च्या (आरकॅप) मालमत्ता खरेदी करण्यासाठी ६० कंपन्या पुढे आल्या आहेत. यातील आठ कंपन्यांनी आरकॅपचे संपूर्ण अधिग्रहण करण्याची तयारी दर्शविली आहे.
सूत्रांनी सांगितले की, आरकॅपचे संपूर्ण अधिग्रहण करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांत ओकट्री, जेसी फ्लॉवर्स आणि सहा पुनर्रचना कंपन्यांचा समावेश आहे. त्यांनी इरादापत्रेही सादर केली आहेत.
कंपनीचा सामान्य विमा व्यवसाय खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांत ब्लॅकस्टोन, केकेआर आणि बेन कॅपिटल यांचा समावेश आहे. बंधन बँक, बेन आणि डाबर यांनी आरकॅपच्या जीवन विमा व्यवसायातील ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि जेएम फायनान्शिअल या संस्था बँकांच्या सल्लागार आहेत. त्यांच्याकडे ६० इरादापत्रे प्राप्त झाली आहेत. ज्या कंपन्यांनी रस दाखविला आहे, त्यांना आरकॅपच्या डाटा रूमचा संपर्क उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर त्यांना वित्तीय निविदा सादर करण्यास सांगितले जाईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, डीएचएफएलचीही सध्या अशीच विक्री प्रक्रिया सुरू आहे. डीएचएफएलसाठी २४ कंपन्यांनी इरादापत्रे सादर केली होती. तथापि, प्रत्यक्षात वित्तीय निविदा केवळ चार कंपन्यांनी सादर केल्या.
सूत्रांनी सांगितले की, आरकॅपच्या सामान्य विमा व्यवसायासाठी १८ कंपन्यांनी इरादापत्रे सादर केली आहेत. ख्रिसकॅपिटल, जेसी फ्लॉवर, ब्लॅकस्टोन, केकेआर, सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स आणि बेन कॅपिटल यांचा त्यात समावेश आहे.
....................