आई, मला शाळेत जायचं हाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:05+5:302021-02-05T04:09:05+5:30
फुलंब्री : उद्या, २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे, ...

आई, मला शाळेत जायचं हाय
फुलंब्री : उद्या, २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे, तर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थीही उत्सुक असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून घरातच असलेल्या मुलांनीदेखील आता पालकांकडे शाळेत जाण्याची आर्जव केली आहे. अर्थात ‘आई, मला शाळेत जायचं हाय’, अशा प्रतिक्रिया विद्यार्थांकडून येऊ लागल्या आहेत.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार २७ जानेवारीपासून सर्व खासगी व सरकारी शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले जात आहेत. यासंबंधी शिक्षण विभागाला सूचना प्राप्त होताच शाळांमध्ये जय्यत तयारी केली जात आहे. शाळा व परिसराची स्वच्छता करणे, शिक्षकांची कोरोना तपासणी करणे, स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे ही कामे केली जात आहेत.
फुलंब्री तालुक्यात पाचवी ते आठवीच्या दरम्यान १२५४ शिक्षक आहेत. त्यापैकी १२ ते २५ जानेवारीदरम्यान बाराशे शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. फुलंब्री तालुक्यात ५ ते ८वी चे वर्ग सुरू होणार याची माहिती पालकांना व विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्याकरिता पालकांची तयारी आहेच, शिवाय विद्यार्थीही आता शाळेत जाण्यास उत्सुक असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात अनेक पालकांचे मत जाणून घेतले असता आम्ही शाळा सुरू होण्याची वाट पाहत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
----------
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया...
गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षण घेत आहे. यातून पाहिजे तसे शिक्षण मिळत नाही. तसेच
कोरोनाचा प्रभाव कमी झालेला आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तर मी शाळेत जाण्यास तयार आहे.
- पवन अशोक मेटे, वर्ग सातवी, जळगाव मेटे.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी एक वर्षापासून शाळा बंद आहेत. घरी बसून कंटाळा आलेला आहे. आता शाळा सुरू होताच मी शाळेत जाणार आहे. - श्रद्धा साईनाथ पांडे, वर्ग आठवी, ममनाबाद.
एका वर्षापासून शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान झाले आहे. २७ जानेवारीला शाळा सुरू होत असल्याची माहिती मिळाली. मी पहिल्या दिवसापासून शाळेत जाणार आहे. - कावेरी अरुण गायकवाड, वर्ग सहावी, वाणेगाव.
उद्या, २७ जानेवारी रोजी शाळा सुरू होत असल्याने मी तयारी केली असून, एका वर्षभराचे नुकसान झालेले आहे. ते भरून काढण्यासाठी परिश्रम घेणार आहे. कोरोनासंदर्भात फारसी भीती माझ्या मनात राहिलेली नाही. शिवराज भागीनाथ शेवाळे, इयत्ता पाचवी, फुलंब्री.
------------
फुलंब्री तालुक्यात ५ ते ८वी वर्गाच्या शाळाची संख्या : २४८
एकूण शिक्षक संख्या : १२५४
पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या : ३,१०९
सहावीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या - ३०११
सातवीच्या वर्गातील विदयार्थी संख्या : २,९१६
आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या : ३००४
-----------
विद्यार्थी काय देताहेत कारणे.
- कोरोनामुळे आहेत खूप महिन्यांपासून घरीच.
- ऑनलाईनमुळे योग्य शिक्षण नाही मिळत.
- कोरोनाची नाही राहिली आता भीती.
- शैक्षणिक नुकसान झाले, आता अधिक परिश्रम घेणार.