प्रत्येक चोराचा पैसा मोदींनी केला पांढरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:34 IST2017-09-09T00:34:34+5:302017-09-09T00:34:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक चोराचा काळा पैसा पांढरा केला असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत बोलताना केली.

प्रत्येक चोराचा पैसा मोदींनी केला पांढरा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक चोराचा काळा पैसा पांढरा केला असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत बोलताना केली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परभणी येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या संघर्ष सभेत खा.राहुल गांधी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांची तर व्यासपीठावर माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, खा.राजीव सातव, खा.रजनीताई पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, आ.अब्दुल सत्तार, हर्षवर्धन पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा.राहुल गांधी म्हणाले की, ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात कुठून आली, ते समजलेच नाही. देशाचे अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे चेअरमन, आर्थिक सल्लागार आदीपैकी कोणालाही याबाबत माहिती नव्हती. रात्री १२ वाजेनंतर ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्दी असतील, असे त्यांनी हसत हसत जाहीर केले. यावेळी काळा पैसा बाहेर येईल, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्यात येतील, अशी खोटी आश्वासने दिली. प्रत्येक वर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार दिला जाईल, असे सांगितले. जनताही त्यांच्यावर विश्वास ठेवून रांगेमध्ये उभी राहिली. परंतु, प्रत्यक्षात मात्र पंतप्रधानांची ही घोषणा फसवी निघाली. देशातील प्रत्येक चोराचा काळा पैसा पांढरा करण्यासाठीच नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली, असा सणसणीत आरोपही यावेळी त्यांनी केला. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या सदस्याने लोकसभेत तीन वर्षात किती बेरोजगारांना रोजगार दिला, असा प्रश्न विचारला तेव्हा, केंद्रातील मंत्र्यांनीच दोन वर्षात फक्त १ लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचे सांगितले. यावर्षी किती जणांना रोजगार दिला, असा सवाल केला असता, यावर्षात एकाही बेरोजगाराला रोजगार दिला नाही, असे त्यांच्याच सरकारचे मंत्री सांगतात. त्यामुळे त्यांची बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणाही फसवीच आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या काळात देशाचा जीडीपी ९ टक्के होता, आता तो ४.५ टक्के आला आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील ९ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली ही शर्मेची बाब आहे. महाराष्ट्रातील सरकारने केलेली कर्जमाफी ही आरएसएस आणि भाजपाची कर्जमाफी आहे. ३५ हजार कोटींची कर्जमाफी केल्याचे मार्केटिंग केले गेले. प्रत्यक्षात मात्र ५ हजार कोटींचीच कर्जमाफी झाली. महाराष्ट्र सरकारने काही निवडक शेतकºयांचीच कर्जमाफी केली असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, हरिभाऊ शेळके, आ.अब्दुल सत्तार, मीनाताई वरपूडकर, आ.संतोष टारफे, अॅड.मुजाहेद खान, तुकाराम रेंगे, आ.एम.एम.शेख यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी प्रास्ताविक तर शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी आभार मानले.