मोबाईल चोर शिरजोर

By Admin | Updated: August 25, 2014 01:37 IST2014-08-25T01:21:39+5:302014-08-25T01:37:32+5:30

उस्मानाबाद : येथील रविवारचा आठवडी बाजाराला मोबाईल चोरट्यांनी कुरण नव्हे तर माहेरघरच बनविले आहे़ पोळा सणानिमित्त महत्त्वपूर्ण असलेल्या रविवारच्या

Mobile thief sharper | मोबाईल चोर शिरजोर

मोबाईल चोर शिरजोर



उस्मानाबाद : येथील रविवारचा आठवडी बाजाराला मोबाईल चोरट्यांनी कुरण नव्हे तर माहेरघरच बनविले आहे़ पोळा सणानिमित्त महत्त्वपूर्ण असलेल्या रविवारच्या आठवडी बाजारातही चोरट्यांनी अनेक मोबाईल लंपास केले़ यातील चौघांनी शहर ठाण्यात तक्रार दिली आहे़
एकीकडे उस्मानाबाद शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे शहरातील नागरिकांची झोप उडाली आहे़ बालाजी नगर, साळुंकेनगरसह परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी स्वत:च गस्त देण्याचे काम सुरू केले आहे़ जिल्ह्यातील सर्वाधिक चोरीच्या घटनाही शहर ठाण्यांतर्गत घडल्या आहेत़ यावर कहर म्हणून मोबाईल चोरांनी आठवडी बाजाराला लक्ष केले आहे़ एक ते दीड वर्षापासून रविवारच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरी होते म्हणजेच होतेच! पोलिस ठाण्यात तक्रारी आल्यानंतर चोरीऐवजी गहाळ नोंद करण्यात येते़ नोंदी घेवून वरिष्ठ कार्यालयाकडे ते क्रमांक पाठवित चौकशी सुरू होते़ मात्र, मोबाईल काही पोलिसांना सापडत नाही़ पोळा सणानिमित्त उस्मानाबादेतील आठवडी बाजारात शेतकऱ्यांसह नागरिकांची गर्दी झाली होती़ या गर्दीचा फायदा घेत समता नगरातील कापड व्यापारी रणदिवे यांच्यासह सहा ते सात जणांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले़ शहर ठाण्यात चौघांनी तक्रारी दिल्या असून, त्याची नोंद करून घेण्यात आली आहे़ वाढत्या मोबाईल चोरीमुळे ग्रामीण भागासह शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)
मोबाईल चोरांना पकडण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आदिनाथ रायकर यांनी पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत़ या बंदोबस्तामुळे काही काळ बाजारात मोबाईल चोरांना चाप बसला होता़ मात्र, त्यानंतर इतर कामामुळे येथील कर्मचारी जात असल्याने मोबाईल चोरांनी पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशावर हात साफ करण्यास सुरूवात केली आहे़
शहर पोलिस ठाण्यात नव्याने काही अधिकाऱ्यांसह कर्मचारी आले असले तरी अद्यापही मंजूर क्षमतेएवढा कर्मचारी वर्ग नाही़ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शासकीय व इतर कामे करणाऱ्या पोलिसांचीही रात्रीची झोप उडाली आहे़ त्यामुळे मोबाईल चोरांचा माग घेण्यात पोलिस प्रशासनास अपयश येत आहे़
उस्मानाबादच्या आठवडी बाजारात वारंवार मोबाईलची चोरी होत आहे़ मोबाईल चोरीचे प्रकार वाढल्याची माहिती असतानाही नागरिक याबाबत काळजी घेत नसल्याचेही दिसून येते़ हजारो रूपयांचे मोबाईल गेल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात येतात़ हे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनीही आठवडी बाजारात जाताना मोबाईल सुरक्षितरित्या ठेवून गर्दीत काळजीपूर्वक वावरण्याची गरज आहे़

Web Title: Mobile thief sharper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.