मनसे अजूनही संभ्रमातच !
By Admin | Updated: September 10, 2014 00:48 IST2014-09-10T00:22:37+5:302014-09-10T00:48:32+5:30
प्रताप नलावडे , बीड विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी बीड जिल्ह्यात मनसे अजूनही संभ्रमातच असल्याचे दिसत आहे.

मनसे अजूनही संभ्रमातच !
प्रताप नलावडे , बीड
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी बीड जिल्ह्यात मनसे अजूनही संभ्रमातच असल्याचे दिसत आहे. वरून काही निरोप नाही आणि नेमके काय करावे, हे समजत नाही, असे अतिशय हाताश होत कार्यकर्ते एकमेकांना सांगू लागले आहेत.
बीड जिल्ह्यात मनसेने दीड महिन्यापूर्वी परळी वगळता सर्व जागा लढविणार असल्याचे सांगितले होते. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात स्वत: माहिती दिली होती. त्यादृष्टीने कार्यकर्ते कामालाही लागले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले असून लवकरच त्यांची बीडमध्ये जाहीर सभा होईल, असेही मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी दीड महिन्यांपासून राज ठाकरे यांची सभा कधी होणार, याचीच प्रतीक्षा कार्यकर्त्यांना आहे.
गेवराई आणि माजलगाव या दोन मतदारसंघात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हालचाली सुरू केल्या असल्यातरी नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आहे आणि तयारीला कोणी लागायचे याचे आदेश अजूनही आलेले नसल्याचे कार्यकर्तेच सांगत आहेत.
लोकसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मनसेची भूमिका गुलदस्त्यातच राहिली होती. उमेदवार देणार असे सांगत असतानाच ऐनवेळी मनसेने आपला उमेदवार दिला नाही. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी भाजपाचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पाठिंबा देत असल्याचे पत्र देत भाजपाला उघडपणे पाठिंबा दिला होता.
विधानसभा निवडणुकीतही नेमके पक्षीय पातळीवर काय भूमिका असेल, याबद्दल कार्यकर्तेच सांशक आहेत.
एका पदाधिकाऱ्याने आपले नाव न छापण्याची विनंती करीत सांगितले, पक्षीय पातळीवरून दीड महिन्यापूर्वी संपर्क झाला होता. त्यानंतर आजवर कोणीही संपर्क केलेला नाही. कोणत्या जागा लढायच्या आहेत, हेही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे परळी वगळता पाच मतदारसंघात उमेदवार उभे करायचे आहेत की नाही, याचीच आमच्या मनात शंका आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जोशही कमी होऊ लागला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांना यासंदर्भात विचारल्यावर ते म्हणाले, संभ्रम वगैरे काही नाही. आम्ही आमच्या पातळीवर तयारी केली आहे आणि आमच्या नेत्यांशीही आमचे बोलणे होत आहे. औरंगाबादला राज ठाकरे येणार आहेत. त्यावेळी ते जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. आमचे कार्यकर्ते जिल्ह्यात जोमाने कामाला लागले आहेत.