मनसेला युतीसाठी सर्व पर्याय खुले

By Admin | Updated: July 11, 2014 00:58 IST2014-07-10T23:40:07+5:302014-07-11T00:58:08+5:30

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करू शकतो. काही पक्षांसोबत आमची बोलणीही सुरू आहेत, असे आज मनसेचे गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले

MNS opens all options for the alliance | मनसेला युतीसाठी सर्व पर्याय खुले

मनसेला युतीसाठी सर्व पर्याय खुले

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करू शकतो. काही पक्षांसोबत आमची बोलणीही सुरू आहेत, असे आज मनसेचे गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मराठवाडा दौऱ्याच्या निमित्ताने ते आज येथे आले होते.
यावेळी नांदगावकर म्हणाले की, मनसेची जनसुराज्य पक्ष, शेकाप यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात नवे समिकरण आकारास येऊ शकते. शिवसेनेवर छगन भुजबळ यांनी जहरी टीका केली, याउपरही भुजबळ ‘मातोश्री’वर जाऊन आले, असे सांगतानाच मनसेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचेही सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दौरा त्यांनी ६ ते १० जुलै दरम्यान केला. लातूरमध्ये निलंगा, उदगीर, अहमदपूर, उस्मानाबादमध्ये भूम-परांडा, उमरगा-लाहोरा तर बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव व बीड विधानसभा मतदारसंघ मनसेसाठी सोयीचे असल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण भागात राज ठाकरे यांची सभा घ्यावी, अशी सर्वत्र मागणी असल्याचे सांगतानाच आगामी काळात मनसे कोणाशीही जुळवून घेऊ शकते, याची शक्यताही त्यांनी वर्तविली. पत्रपरिषदेस माजी आ. सुनील धांडे, जिल्हाध्यक्ष डॉ. भागवत सानप, रेखा फड, शैलेश जाधव उपस्थित होते़
बैठकीत कार्यकर्त्यांची नाराजी
पत्रपरिषदेपूर्वी आ. नांदगावकर यांनी बीडमधील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आंदोलनाच्या वेळी अटक झालेल्या कार्यकर्त्यांना मनसेचे वरिष्ठ नेते मदत करीत नसल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी, ‘होते असे कधी-कधी’ असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
ब्लू प्रिंट मध्ये सहा मुद्दे
पाणी, आरोग्य, रस्ते, वीज, कायदा व सुव्यवस्था या सहा मुद्यावर आधारित व लोकांचे प्रश्न व त्यांना सोडविण्यासाठी उत्तरांसह असलेले ‘ब्लू प्रिंट’ लवकरच जाहीर करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच आमची सत्ता येणार हे सांगताना ते म्हणाले की, हे वक्तव्य ‘ओव्हर’ नाही तर ‘मोअर’ आहे, असे म्हणत बीडची उमेदवारी माजी आ. सुनील धांडे यांना देण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले़

Web Title: MNS opens all options for the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.