आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:28 IST2025-08-29T18:27:54+5:302025-08-29T18:28:34+5:30
अंबादास दानवेंच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष!

आमदारकीचा कार्यकाळ संपला; दानवे आता विरोधकाची भूमिका वठविणार की सत्तेकडे जाणार?
- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर :अंबादास दानवे यांचा औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकी व विधान परिषद विरोधी पक्षनेता पदाचा कार्यकाळ शुक्रवारी (दि.२९ ऑगस्ट) संपुष्टात येत आहे. दानवे भविष्यात ठाकरे गटातूनच विरोधकाची भूमिका वटविणार की सत्तेकडे जाणार? अशी चर्चा आता जोर धरते आहे.
दानवे २२ ऑगस्ट २०१९ रोजी आमदार झाल्यानंतर चार महिन्यांनीच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. विशेष म्हणजे २०१९ साली भाजपाचे या मतदारसंघात सर्वाधिक १८९ नगरसेवक मतदार असतानाही त्यांना युतीमुळे उमेदवारी मिळाली. शिवसेनेचे तेव्हा १४१ नगरसेवक मतदार या मतदारसंघात होते. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दानवे यांनी ५२४ मते घेत आघाडीचे उमेदवार भवानीदास उर्फ बाबूराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला होता. २९ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली होती. एमआयएमची सुमारे २५ ते अपक्षांची ९ मते दानवे यांना मिळाल्यामुळे राजकारण तापले होते. तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आखलेल्या रणनीतीमुळे दानवे विजयी झाल्याची तेव्हा चर्चा होती.
आता पुढे काय...
या सहा वर्षांत माजी खा. चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यात सख्य राहिले नाही. दानवे यांना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र ठाकरे गटाने खैरेंना उमेदवारी दिली. दानवे शिंदेगट किंवा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या. दोन्ही पक्षांतून त्यांना विरोध असल्याचेही बोलले गेले. पावसाळी अधिवेशनात त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मूळचे भाजपचे असल्याचा उल्लेख केल्याने पुन्हा राजकीय चर्चा रंगल्या. त्यामुळे २०२९ पर्यंत दानवे ठाकरे गटातूनच विरोधकाची भूमिका वटविणार की सत्तेकडे जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
दानवे काय म्हणाले,
सहा वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघासह राज्यभर काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे या कार्यकाळाबाबत समाधानी आहे. ठाकरे गटाचे नेते म्हणून संघटनेचे काम सुरू राहील.
-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते